Vaccine Certificate: कोविड 19 लस घेणार्‍यांना QR Code सह वॅक्सिन सर्टिफिकेट मिळणार; पहा कुठे होऊ शकतो त्याचा  फायदा
COVID-19 Vaccine (Photo Credits: ANI)

मुंबई मध्ये आज पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट मधून कोविशिल्ड लसीचे लाखभर डोस घेऊन पहिली बॅच दाखल झाली आहे. दरम्यान येत्या शनिवारी म्हणजे 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, लस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये वॅक्सिन सर्टिफिकेट दिले जाणार आहे. यामध्ये एक क्यू आर कोड देखील असेल. हा युनिक क्यु आर कोड प्रत्येक व्यक्तीसाठी Covid-19 immunisation चा पुरावा असणार आहे. Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?

 

कोविन सिस्टिमच्या आधारे ही लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरमकडून 9,63,000 तर भारत बायोटेक कडून 20 हजार डोस उपलब्ध झाले आहे. पण राज्यातील 8 लाख आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या पाहता प्रत्येकी 2 बाटल्या यानुसार 17,50,000 डोस उपलबब्ध होणं गरजेचे आहे. यामध्ये 10% डोस खराब होऊ शकतात याचा देखील विचार करायला हवा. त्यामुळे नवा स्टॉक लवकरच येईल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

क्यू आर कोड कसा फायदा देणार?

  • क्यू आर कोड बेस्ड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट मोबाईल मध्ये सेव केली जाऊ शकतो.
  • आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्‍यांसाठी हे सर्टिफिकेट 'वॅक्सिन पासपोर्ट' असेल. सोबत इम्युनायझेशनचे खोटे दावे करणार्‍यांसाठी रोखण्यात मदत होणार आहे.
  • प्रत्येकाकडे सर्टिफिकेट असेल म्हणजे त्याने लस घेतली आहे याची माहिती मिळणार आहे.

दरम्यान आज मुंबई मध्ये दाखल झालेला कोविशिल्ड लसीचा साठा परळ येथील एफ दक्षिण कार्यालयामध्ये ठेवण्यात आला आहे. लसीकरणाच्या वेळेस तो शहरातील 9 हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रावर पाठवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोविड योद्धे आणि आरोग्य कर्मचारी यांना ही लस मोफत दिली जाणार आहे.