Vaccination In India| Photo Credits: Pixabay.com

भारतामध्ये आज Covaxin, Covishield या दोन कोविड लसींना (Covid 19 Vaccine) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने लसीकरणाला सुरूवात होणार आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला स्वतःची नोंदणी करून तुमचा कोविडचा डोस निश्चित करायचा आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यांत आरोग्य कर्मचारी, पोलिस, डॉक्टर यांचा समावेश केला जाणार आहे त्यानंतर सहव्याधी असणारे नागरिक आणि टप्प्याने टप्प्याने उर्वरित जनतेला लस दिली जाईल. पण तुमची या कोविड 19 लसीकरण मोहिमेमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने अंमलंबलेली प्रक्रियाच पार पाडणं फायदेशीर आहे. मग जाणून घ्या आता Co-WIN System द्वारा पार पडणारी ही सुरक्षित कोविड 19 लसीकरणाची प्रक्रिया कशी असेल? कुठे, कधी तुम्हांला लस मिळू शकते आणि त्यासाठी Co-WIN वर नेमकं रजिस्ट्रेशन कसं कराल? Covaxin, Covishield Vaccines 110% सुरक्षित; कोविड 19 लसी लोकांना नापुंसक बनवत असल्याच्या दाव्याला DCGI Dr VG Somani यांनी फेटाळलं (Watch Video).

भारतामध्ये कोविड19 लसीकरणामध्ये सहभागी होण्यासाठी Co-WIN  वर रजिस्ट्रेशन कसं कराल?

  • Co-WIN System द्वाराच लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन होणार असल्याने तुम्हांला गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर वरून Co-WIN App डाऊनलोड करावं लागणार आहे.
  • अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही वॅलिड फोटो आयडी वापरून रजिस्ट्रेशन करू शकतात. यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स सह 12 ओळखपत्रांपैकी कोणत्याही एकाचा वापर करून रजिस्ट्रेशन करू शकता.
  • रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्यानंतर 3 एसएमएस येतील. त्यामध्ये पहिला एसएमएस तुमच्या रजिस्ट्रेशन कंफर्मेशनचा असेल. दुसरा एसएमएस हा लसीकरणाचा वेळ, तारीख, स्थळ यांचा असेल. तिसरा एसएमएस हा लसीच्या दुसर्‍या डोसची आठवण करून देणारा असेल.
  • लसीकरण केंद्र देखील 3 विभागात असेल यामध्ये वेटिंग रूम, वॅक्सिनेशन रूम आणि ऑब्झर्वेशन रूम असतील. तुमच्या लसीकरण केंद्रावर तुम्ही पोहचल्यानंतर तुमच्या नावाची ओळख पटवली जाईल. त्यासाठी ग्राह्य ओळखपत्र तुमच्या जवळ असणं आवशयक आहे.
  • लसीकरण केंद्रावर पुढील ऑफिसर तुमची माहिती Co-WIN App वर पडताळून पाहणार आहे.
  • माहिती तपासल्यानंतर वॅक्सिनेशन रूममध्ये तुम्हांला लस दिली जाईल.
  • लस दिल्यानंतर 30 मिनिटं प्रत्येकाला ऑब्झर्वेशन रूम मध्ये प्रतिक्षा करावी लागणार आहे. इथे लसीकरणानंतर तुम्हांला काही गंभीर त्रास तर होत नाही ना? याची माहिती घेतली जाणार आहे.
  • त्यानंतर ऑफिसर तुम्हांला 30 मिनिटांच्या वेळेत लसीकरणाबद्दल माहिती देतील. तुमच्या शंकांचं निरसन करतील. पुढील डोस बाबत माहिती देतील.
  • भारतामध्ये देण्यात येणार्‍या लसी या 2 शॉर्ट्स मध्ये दिल्या जाणार आहेत. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर ठरवून दिलेल्या वेळेत दुसरा डोस घेण्यासाठी नक्की जा. दोन्ही डोस घेतल्यानंतरच तुमचं पूर्ण संरक्षण होण्यास मदत होणार आहे. त्याबाबतचा एसएमएस तुमच्या मोबाईलवर येणार आहे.

COVID-19 Vaccination Begin in India (Photo Credits: Twitter)

भारतामध्ये लसीकरणाची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने होणार आहे. त्याचि माहिती वेळोवेळी सरकारी यंत्रणेद्वारा दिली जाणार आहे. हे लसीकरण कुणावरही बंधनकारक नसेल असे काही दिवसांपूर्वी आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुमची लस घेण्याचि इच्छा असेल तर ती सुरक्षितपणे घेण्यासाठी तुम्हांला को विन अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणांकडून दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत को विन वर 75 लाख नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.