Coronavirus Lockdown च्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात फरसाण, मिठाई दुकानांसह 'या' सेवा सुरु होण्याची शक्यता
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवत असल्याची घोषणा 14 एप्रिल रोजी केली. मात्र लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम कायम आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकार मिठाई, फरसाणची दुकाने सुरु करण्यास परवानगी देणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्य सचिव (Chief Secretary of Maharashtra) अजोय मेहता (Ajoy Mehta) यांनी एक नोटीस जारी केली असून त्यात जिल्हाअंतर्गत तसंच जिल्हा बाहेरील वाहतूकही सुरु करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यात शेती, फळ उत्पादन या संबंधित वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात खाद्यपदार्थ, भाज्या, फळे, किराणा सामान, बेकरी या जीवनावश्यक सेवा सुरु होत्या. मात्र नव्याने जारी झालेल्या नोटीसनुसार, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मिठाई, फरसाण यांची दुकाने सुरु होऊ शकतात. तसंच शेतीविषयक वाहतुकीला देखील परवानगी दिली जावू शकते. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात हायवे वर अडलेल्या ट्रक ड्रायव्हर्संना या नोटीसमुळे दिसाला मिळाला आहे. तसंच या निर्यणामुळे ठिकठिकाणी अडकलेला माल इच्छित स्थळी पोहचून विविध उद्योग सुरु होतील. या संबंधित नव्या ऑर्डर्स राज्य सरकार लवकरच जारी करेल अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र ही परवानगी कोरोनाचे हॉटस्पॉट नसलेल्या भागातच दिली जाईल अशीही माहिती समोर येत आहे. (Coronavirus Lockdown च्या काळात अपरिहार्य कारणासाठी मुंबई बाहेर पडायची मिळू शकते परवानगी, mumbaipolice.gov.in वर मुंबई पोलिसांकडे अशी मागा मदत!)

राज्याच्या सीमा केवळ महत्त्वाच्या किंवा अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी सुरु राहणार असल्याचेही यात म्हटले आहे. तसंच या वाहतुकी दरम्यान ड्रायव्हर शिवाय केवळ एकच व्यक्ती ट्रक मधून प्रवास करु शकेल. त्या व्यक्तीकडे व्हॅलिड कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे. तसंच सामानाची डिलिव्हरी केल्यानंतर मार्गात सामान घेऊन पुन्हा वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्योगधंद्यासंबंधित वाहतूक, खत, कीटकनाशके, बी-बियाणे, अन्नधान्य, औषधे, यांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच पीठ, डाळी, तेल यांसारख्या वस्तूंच्या निर्मितीत सहभागी असणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना परवानगी देण्यात येईल.