Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता प्रतिक्षा आहे दुसऱ्या टप्प्याची. लोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा येत्या 18 एप्रिल रोजी पार पडत आहे. या टप्प्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी (NCP) , शिवसेना (Shivsena)आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi)अशा तिन पक्षांमध्ये सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडन राजेंद्र शिंगणे, शिवसेना - प्रतापराव जाधव तर बहुजन वंजित आघाडीकडून बळीराम सिरस्कर रिंगणात आहेत.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील एकूण राजकीय स्थितीवर नजर टाकायची तर, 2014 च्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने बाजी मारली होती. शिवसेना उमेदवार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार कृष्णाराव इंगळे यांचा पराभव केला होता. हा पराभवही मोठ्या फरकाने झाला होता. प्रतापराव जाधव यांनी कृष्णाराव इंगळे यांच्या विरोधात तब्बल १,५९,५७९ मतांनी आघाडी घेतली होती.
लोकसभा निडवणूक 2014: उमेदवारांना मिळालेली एकूण मते
2014 प्रमाणे याही वेळी शिवसेना भाजप युती झाली आहे. तर कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला समोरे जात आहेत. परंतू, 2014 च्या तुलनेत या वेळी राजकीय स्थिती प्रचंड बदलली आहे. 2014 मध्ये काँग्रेस विरोधी लाट होती. या लाटेत मतदारांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या पारड्यात भरभरुन दान टाकले. त्या वेळी नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. नरेंद्र मोदी यांनी केलेली प्रचारकी भाषणांचा प्रभाव मतात परावर्तीत होण्यास मोठा फायदा झाला. त्यामुळे काँग्रेस आणि मित्र पक्षांसह भाजप आणि रालोआचे विरोधक धुळीला मिळाले. भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आला. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)
दरम्यान, या वेळी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पक्षांनी आपापल्या समविचारी पक्षांसोबत युती किंवा आघाडी केली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी या प्रमुख राजकीय पक्षांसोमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. बहुजन वंचित आघडीचे उमेदवार राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघात उभे नाहीत. पण, वंचित बहुजन आघाडीने एकूण 38 मतदारसंगात उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी काही मतदारसंघांमध्ये वंचित बहुजनत आघाडीचे उमेदवार प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना जोरदार टक्कर देत आहेत. उदा. सोलापूर, सांगली लोकसभा मतदारसंघ.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातही बंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार लक्षवेधी पद्धतीने चालला आहे. शिवसेना भाजपनेही आपापल्या पद्धतीने जोर लावला आहे. त्यामुळे बुलढाण्याची जनता कोणाला आपला कौल देते याबाबत उत्सुकता आहे. राजकीय जाणकार आणि विश्लेषकांच्या अंदाजानुसार बोलायचे तर बहुजन वंचित आघाडी येथे किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अर्थात कोणी काहीही अंदाज वर्तवले तरी, राजकीय मंडळींनी केलेल दावे आणि त्यातील वास्तव हे सर्व सत्य प्रत्यक्ष मतमोजणीदिवशीच समोर येणार आहे. तोपर्यंत ही उत्सुकता कायम राहणार हे नक्की.