मराठी माणसाच्या अस्तित्वाचा लढा देताना ज्यांनी आयुष्य वेचलं अशा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची यंदा 7 वी पुण्यतिथी आहे. 17 नोव्हेंबर 2012 रोजी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले होते. व्यंगचित्रकार, पत्रकार ते नंतर शिवसेना प्रमुख रूपातील बाळासाहेब ठाकरे हा त्यांचा प्रवास अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. 1966 साली शिवसेना पक्ष स्थापनेनंतर 2012 पर्यंत त्यांनी पक्षाची धुरा एकहाती सांभाळली होती, निश्चितच यामागे लाखो शिवसैनिकांचा पाठींबा होता पण हा आधार टिकवून ठेवणं हे काम बाळासाहेबांनी अगदी लीलया पार पाडले होते. (बाळासाहेब ठाकरेंना या 3 नेत्यानी दिली सर्वात जास्त यातना)
बाळासाहेब हे पक्षप्रमुख असले तरीही त्यांनी सक्रीय राजकारणात म्हणजे निवडणुकांचा स्वतः सामना केला नाही मात्र महाराष्ट्रासाठी त्यांनी राजकारणामध्ये अनेक चक्र फिरवली, किंबहुना यामुळेच अजूनही राजकीय वर्तुळात शिवसेनेचा दरारा कायम आहे. यंदाच्या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेबांच्या आयुष्याशी संबधित काही खास पैलू आपण पाहणार आहोत..
1) 23 जानेवारी 1926 रोजी केशव ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांच्या घरी बाळासाहेबांचा जन्म झाला. केशव ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे हे स्वतः एक सामाजिक कार्यकर्ते व लेखक असल्याने कणखर बाणा आणि विचारसरणी ही कुटुंबाची देणगी बाळासाहेबांना लाभली होती.
2) बाळासाहेब ठाकरे यांच्या आडनावाची मूळ इंग्रजी स्पेलिंग ही Thakre अशी होती, मात्र कालांतराने इंग्रजी लेखक William Makepeace Thackeray यांच्या नावानुसार त्यांनी या स्पेलिंगमध्ये बदल करून Thackrey असे आडनाव वापरण्यास सुरुवात केली.
3) बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली शिवसेना पक्ष स्थापन केला. त्यांची राजकारणातील भूमिका भूमिपुत्रांच्या हक्कांशी संबंधित कामातून सुरु झाली होती. 'उठाव लुंगी बजाव पुंगी' अशा आंदोलनातून त्यांनी दाक्षिणात्य आणि लागूनच गुजराती व्यापाऱ्यांच्या महाराष्ट्रातील व्यवसायाचा निषेध केला होता.
4)बाळासाहेबांनी अनेकदा आपल्या भाषणातून काँग्रेस पक्षावर घणाघाती हल्ले केले होते, मग ते काँग्रेसला मागासवर्गीय म्हणणे असो वा एक वेळा ब्रिटिशांच्या हाती सत्ता देईन पण काँग्रेसला साथ देणार नाही असे ठाम मत मांडणे असो त्यांचा आणो काँग्रेसचा सूर एकत्र आल्याचे फार संदर्भ नाहीत.असं असलं तरीही 1975 साली लागू झालेल्या आणीबाणी मध्ये, तसेच बांगलादेश मुक्ती संग्रामात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेला बाळासाहेबांनी उघडपणे पाठिंबा दिला होता.
5)बाळासाहेबांच्या भोवती शिवसैनिकांसोबतच सेलिब्रिटी मंडळींचा देखील गराडा असायचा. अमिताभ बच्चन यांना जेव्हा 1982 साली कुली सिनेमाच्या शुटिंगवेळी दुखापत झाली होती, तेव्हा बाळासाहेबांनी मुंबई विमानतळावर खास ऍम्ब्युलन्स पाठवली होती ज्यामुळे अमिताभ यांना ब्रिज कँडी रुग्णालयात वेळेत नेता आले होते. याशिवाय लता मंगेशकर, दिलीप कुमार, सचिन तेंडुलकर तर पॉपस्टार मायकल जॅकसन या सेलेब्रिटींशी सुद्धा ठाकरेंचे चांगले संबंध होते.
6) बाळासाहेब यांनी सामना हे शिवसेना मुखपत्र सुरु केल्यावर त्यांची खुमासदार लेखन शैली प्रकर्षाने समोर आली होती. एका अग्रलेखात त्यांनी मित्रपक्ष भाजपा आणि सेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर सुद्धा निशाणा साधला होता. मनोहर यांनी एका सभेत बोलताना भाजपा आणि शिवसेना हे राम आणि लक्ष्मणासारखे भाऊ आहेत असे म्हंटले होते. याच विधानावर ठाकरे यांनी सामनातून लिहिताना, " नशीब की, त्यांनी आम्हाला वानरसेना म्हंटले नाही" असे लिहीत मनोहर यांचा खरपूस समाचार घेतला होता.
7)बाळासाहेब आणि शिवसेना पक्षावर 1992 सालच्या मुंबईतील दंगलीमध्ये अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप होता. यामध्ये तब्बल 900 जणांचा बळी गेला असल्याने प्रकरण चांगलेच तापले होते. मात्र शेवटपर्यंत या बाबतीत कोणताही आरोप सिद्ध होऊ शकला नाही.
बाळासाहेब यांच्या निधनानंतर मुंबईतील शिवसेना भवन, मातोश्री बाहेर लोकांनी लाखोंच्या संख्येत उपस्थिती लावली होती. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात त्यांच्या पार्थिवाला शिवाजी पार्क येथे अग्नी देण्यात आला होता. यावेळी लाखो शिवसैनिकांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांना निरोप दिला होता.