Bal Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरेंना या 3 नेत्यानी दिली सर्वात जास्त यातना
Bal Thackeray Jayanti (Photo Credits: Facebook)

Balasaheb Thackeray Jayanti 2019: महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्रांसाठी लढलेल्यांमध्ये एक नाव नेहमीच अग्रस्थानी राहील ते म्हणजे बाळ केशव ठाकरे (Bal Keshav Thackeray) . व्यंगचित्रकार, पत्रकार ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा त्यांचा प्रवास अनेक चढउतारांचा होता. बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख असले तरीही त्यांनी सक्रीय राजकारणात म्हणजे निवडणुकांचा स्वतः सामना केला नाही मात्र महाराष्ट्रासाठी त्यांनी राजकारणामध्ये अनेक चक्र फिरवली.  1966 साली शिवसेनेच्या (Shivsena)  स्थापनेपासून 2012 साली त्यांच्या निधनापर्यंत त्यांच्या भोवती नेहमीच समाजातील अनेक प्रतिष्ठीत लोकांचा गराडा होता. मात्र या काळात बाळ ठाकरेंनी त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जडणघडणीत अनेक जवळची लोकं अकाली गमावली. प्रामुख्याने शिवसेना महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवत असताना त्यांच्या जवळच्या तीन बड्या नेत्यांनी शिवसेनेपासून दूर होणं त्यांना खूपच वेदनादायी ठरलं होतं. Bal Thackeray Birth Anniversary: शिवसेना भवनासमोर 33000 रुद्राक्षांनी साकारले हुबेहुब बाळासाहेब! (Photos)

राज ठाकरे -

राज ठाकरे (Raj Thackeray)  आणि बाळ ठाकरे हे काका-पुतण्याचं नातं असलं असलं तरीही लहानपणापासून राज ठाकरे बाळासाहेबांच्या अगदी जवळ होते. शिवसेनेच्या सभेत शिवाजी पार्कवर पहिलं भाषण देण्यापासून महाराष्ट्रभर दौरे, निवडणुकांच्या आखणीमध्ये बाळासाहेबांबरोबर राज ठाकरे होते. मात्र शिवसेनेमध्ये होणारी घुसमट बोलून दाखवताना 'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय' असं म्हणत राज ठाकरेंनी 2006 साली शिवसेनेला रामराम ठोकला. हा निर्णय राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांसाठीही अत्यंत वेदनादायी होता. महाराष्ट्र राज ठाकरेंकडे बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून पाहत असताना राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर शिवसेना फुटली. मराठी मतांमध्ये विभाजन झालं. याचा फटका निवडणूकांमध्ये शिवसेनेला बसला.

छगन भुजबळ -

मुंबईत सामान्य भाजीविक्रेता ते शिवसैनिक आणि नगरसेवक, महापौर अशी मानाची पदं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी शिवसेनेमध्ये राहून भूषवली. छगन भुजबळ यांनी सुमारे 25 वर्षे शिवसेनेसाठी काम केले. ओबीसी नेते छगन भुजबळांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात सेना पोहचवण्याचं काम केलं मात्र 1991 साली बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत टोकाचे मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा आवाज महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून पोहचवणारा हा नेता शिवसेनेला सोडून जाणं बाळासाहेबांसाठी वेदनादायी प्रसंगांपैकी एक होता.

नारायण राणे -

शिवसेना आणि नारायण राणे (Narayan Rane) हे समीकरणंच काही वेगळं आहे. एकेकाळी शिवसेनेकडून राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेले नारायण राणे आज शिवसेनेचे कट्टर शत्रू आहेत. 1996 साली शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री आणि 1999 साली ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले 2005 साली शिवसेनेतून नारायण राणे बाहेर पडले.

शिवसैनिकच माझा श्वास आहेत असे बाळासाहेब ठाकरेंनी अनेक सभांमधून सांगितले आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा हा त्यांनी शिवसैनिकांना कानमंत्र दिला होता. 2012 साली बाळासाहेब ठाकरे यांचे राहत्या घरी निधन झाले.