World's Longest Luxury River Cruise: वाराणसीपासून सुरू होणार जगातील सर्वात लांब Ganga Vilas Cruise ट्रिप; 50 दिवसांत पूर्ण करणार 3200 किमी प्रवास
Ganga Vilas Cruise (संग्रहित संपादित प्रतिमा)

वाराणसी (Varanasi) या पवित्र शहरातून जगातील सर्वात लांब क्रूझचा प्रवास सुरू होणार आहे. पुढील वर्षी, म्हणजे 10 जानेवारी 2023 रोजी 'गंगा विलास क्रूझ जहाज' (Ganga Vilas Cruise) नावाचे लक्झरी क्रूझ जहाज आपल्या 3200 किलोमीटरच्या प्रवासाला निघेल. वाराणसीपासून सुरू होणाऱ्या या क्रूझचे गंतव्यस्थान आसाममधील दिब्रुगड असेल, परंतु दरम्यान ते बांगलादेशी सीमेवरूनही जाईल. या संपूर्ण प्रवासाला 50 दिवस लागतील. हे क्रूझ तो भारत आणि बांगलादेशच्या 27 नद्यांमधून प्रवास करेल.

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीमध्ये वाराणसी-डिब्रूगड दरम्यान धावणाऱ्या या क्रूझचे वेळापत्रक 11 नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते. त्यांनी केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत सात कम्युनिटी जेटींचे उद्घाटन केले आणि रविदास घाट येथे आठ कम्युनिटी जेटींची पायाभरणी केली. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडेही उपस्थित होते.

या 'गंगा विलास क्रूझ'ची लांबी 62.5 मीटर आणि रुंदी 12.8 मीटर असेल. भारतात बांधलेले हे पहिले नदी जहाज आहे. यात 18 सर्वोत्तम सूट असतील ज्यात प्रवासी प्रवास करतील. यामध्ये बाथरूम, शॉवर, कन्व्हर्टेबल बेड, फ्रेंच बाल्कनी, एलईडी टीव्ही, तिजोरी यासह आधुनिक जीवनरक्षक प्रणाली देखील असेल. याशिवाय या ट्रिपला अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी 40 सीटर रेस्टॉरंट, सन डेक आणि स्पा आहे. येथे बुफेमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय पदार्थ दिले जातील. या जहाजामधून एकावेळी 80 प्रवासी प्रवास करू शकतील.

3200 किलोमीटरच्या या प्रवासात कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम पाहायला मिळणार आहे. ही क्रूझ वाराणसी ते कोलकात्याच्या हुगळी नदीपर्यंत सर्व प्रमुख ठिकाणी थांबेल. 50 दिवसांच्या या प्रवासात, जागतिक वारसा म्हणून प्रसिद्ध असलेल्या किंवा जगातील अद्वितीय ठिकाणांमध्ये गणल्या गेलेल्या अशा 50 ठिकाणी ही क्रूझ थांबेल. यामध्ये सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. (हेही वाचा: Free Air Tickets: आता मोफत Hong Kong ला भेट देण्याची संधी; वाटण्यात येणार 5 लाख विमान तिकिटे, जाणून घ्या सविस्तर)

एका नदीवरील असलेला जहाजाचा हा प्रवास जगातील सर्वात लांब प्रवास असेल. त्यामुळे भारत आणि बांगलादेश हे दोन्ही देश रिव्हर क्रूझ पर्यटनाच्या नकाशावर जगामध्ये प्रसिद्ध होतील, अशी आशा आहे. या शिवाय भारतातील इतर नद्यांमध्येही रिव्हर क्रुझिंगबाबत जागरूकता वाढेल.