कोरोना महामारीपूर्वी जगभरात पर्यटन व्यवसाय सुरळीत चालू होता. लाखो लोक दरवर्षी विविध देशांना भेटी देत असत. यामध्ये हाँगकाँगदेखील (Hong Kong) एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ होते. परंतु कोरोनाच्या काळापासून येथे पर्यटकांची संख्या सातत्याने कमी होत आहे. यामुळे हाँगकाँगचे बरेच नुकसान झाले. आता कोरोनानंतर पुन्हा पर्यटक येऊ लागले आहेत, परंतु ती संख्या अजूनही पूर्वीप्रमाणे नाही. अशा परिस्थितीत हाँगकाँगने पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन योजना आणली आहे.
हाँगकाँगचे विमानतळ प्राधिकरण पर्यटकांना 500,000 मोफत विमान तिकिटे देणार आहे. पुढील वर्षी ही तिकिटे वाटली जातील. या तिकिटांची किंमत सुमारे $254.8 दशलक्ष असेल. हाँगकाँगने विमान उद्योगाला मदत करण्यासाठी मदत पॅकेजचा भाग म्हणून या प्रदेशातील देशांतर्गत विमान कंपन्यांकडून ही हवाई तिकिटे खरेदी केली होती. आता हाँगकाँगमध्ये कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेले कडक नियम मागे घेण्यात आले असून, प्रदेशात पुन्हा पर्यटकांची संख्या वाढवण्याची तयारी सुरू आहे.
हाँगकाँग पर्यटन मंडळाचे कार्यकारी संचालक डेन चेंग म्हणाले, विमानतळ प्राधिकरण एअरलाइन कंपन्यांसोबतच्या व्यवस्थेला अंतिम स्वरूप देईल. एकदा का सरकारने सर्व कोविड-19 निर्बंध काढून टाकण्याची घोषणा केली, की ते देशात येणार्या प्रवाशांसाठी मोफत विमान तिकिटांच्या जाहिरात मोहिमेला सुरुवात करतील. पुढील वर्षी शहराच्या विमानतळ प्राधिकरणाकडून इनबाउंड आणि आउटबाउंड प्रवाशांना मोफत तिकिटे दिली जातील.
हाँगकाँग त्याच्या कडक कोरोना नियमांमुळे उर्वरित जगापासून दूर गेला होता. याआधी हाँगकाँगला येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या स्वखर्चाने 21 दिवस हॉटेलच्या खोलीत राहणे बंधनकारक होते. यामध्येही फक्त हाँगकाँगच्या रहिवाशांनाच प्रवेश दिला जात होता. नंतर हा कालावधी सात दिवस केला व अखेर तीन दिवसांवर आणण्यात आला. त्यानंतर 26 सप्टेंबर रोजी हा नियम अधिकृतपणे रद्द करण्यात आला. (हेही वाचा: दोन वर्षांनी पुन्हा सुरू होणार लक्झरी ट्रेन 'पॅलेस ऑन व्हील्स'; मिळणार 5 स्टार रूम, जिम-स्पा सारख्या सुविधा, जाणून घ्या भाडे)
ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग सर्व्हिस एक्सपेडियाच्या मते, हाँगकाँग ते टोकियोपर्यंतच्या फ्लाइटच्या सर्चमध्ये नऊ पटीने वाढ झाली आहे. आता हाँगकाँगमध्ये येणाऱ्या विमान तिकीट शोधणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही सकारात्मक गोष्ट पाहता, सरकारला अधिकाधिक पर्यटकांना देशातील विविध ठिकाणी भेट देण्याची परवानगी द्यायची आहे. कोरोनाच्या आधी ज्या प्रकारे लोक मोठ्या संख्येने हाँगकाँगला जायचे, त्याच पद्धतीने ते पुन्हा यावेत अशी सरकारची इच्छा आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर बनवलेले अनेक नियम काढून टाकण्यात आले आहेत.