Shri Ramayana Express (Photo Credits: Wiki Commons)

भारतीय रेल्वे (Indian Railway) आपला महसूल वाढवण्यासाठी रेल्वे पर्यटनावर भर देत आहे. या संदर्भात आयआरसीटीसीने (IRCTC) 4 नवीन रामायण सर्किट स्पेशल ट्रेन (Shri Ramayana Yatra Special Train) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या चार गाड्या मदुराई, पुणे, श्री गंगानगर आणि अहमदाबाद येथून सुटतील. या गाड्या नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात चालवल्या जातील. रेल्वेच्या आधीच्या घोषणेनुसार पहिली रामायण विशेष ट्रेन 7 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यानंतर या चार ट्रेन पैकी पहिली ट्रेन 16 नोव्हेंबरला सुरू होईल. दुसरी ट्रेन 25 नोव्हेंबरला तर तिसरी ट्रेन 27 नोव्हेंबरपासून सुरू होईल. चौथी ट्रेन 20 जानेवारीपासून सुरू होईल.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने रामायण सर्किट स्पेशल ट्रेनसाठी देऊ केलेले पॅकेज 82,950 रुपयांचे आहे. याच्या कराचा काही भाग स्वतंत्रपणे भरावा लागेल. या पॅकेज अंतर्गत एसी क्लासमध्ये प्रवास, एसी हॉटेलमध्ये राहण्याची सोय, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था, वेगवेगळ्या ठिकाणी एसी बसेसद्वारे साइट व्हिजिट, प्रवास विमा आणि आयआरसीटीसीच्या टूर मॅनेजर्सची सेवा समाविष्ट आहे.

या विशेष ट्रेनबद्दल IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रेनमध्ये जास्तीत जास्त 156 प्रवासी बसू शकतात. पहिल्या ट्रेनचे बुकिंग जवळपास पूर्ण झाले आहे. ट्रेनमध्ये राहण्यासाठी, दोन प्रकार आहेत- प्रथम श्रेणी एसी आणि द्वितीय श्रेणी एसी. अतिरिक्त गाड्यांमध्ये स्लीपर आणि 3 एसी क्लासचे डबेही उपलब्ध असतील. यासाठी किमान पॅकेजची किंमत 7560 रुपये आणि कमाल किंमत 16065 रुपये आहे.

जर तुम्हाला या ट्रेनमध्ये प्रवास करायचा असेल तर तुमचे पूर्ण लसीकरण झाले असणे गरजेचे आहे, याशिवाय प्रत्येक प्रवाशाला सुरक्षा किट देखील देण्यात येईल, यामध्ये फेस मास्क, हँडग्लोव्हज आणि सॅनिटायझर्स असतील.

केंद्र सरकारने 'देखो अपना देश' कार्यक्रम सुरू केला आहे, हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने धार्मिक गाड्या सुरू केल्या आहेत. रामायण सर्किट स्पेशल ट्रेन आधीपासून सुरु होती, मात्र, त्यात फक्त स्लीपर क्लासची सुविधा होती. आताची ही पहिली ट्रेन डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेन आहे ज्यात अनेक सुविधा आहेत. उदाहरणार्थ, सेन्सरवर आधारित वॉशरूम सुविधा, फूट मालिश, दोन रेस्टॉरंट्स आणि एक आधुनिक स्वयंपाकघर. (हेही वाचा: Indian Railways AC Travel: वातानुकूलीत रेल्वे प्रवास आता स्वस्त दरात, भारतीय रेल्वेची घोषणा)

रामायण सर्किट स्पेशल ट्रेन आपल्या प्रवासादरम्यान श्री रामजन्मभूमी मंदिर, हनुमान मंदिर, नंदीग्राम येथील भारत मंदिर, बिहारमध्ये जिथे माता सीतेचा जन्म झाला ते सीतामढी, राम जानकी मंदिर जनकपूर. नंतर ट्रेन वाराणसीला पोहोचते आणि रस्त्याने वाराणसी, प्रयागराज, शृंगवेरपूर आणि चित्रकूटला भेट दिली जाते. ही ट्रेन नाशिक, हंपी आणि रामेश्वरम देखील कव्हर करते. रेल्वे संपूर्ण दौऱ्यात  प्रवाशांना 7500 किमी प्रवास घडवते.