Global Tourism: कोरोना विषाणूमुळे जगातील पर्यटन क्षेत्राला पाच महिन्यांत 320 अब्ज डॉलर्सचे नुकसान; 12 कोटी नोकऱ्या धोक्यात- UN 
Goa (Photo Credit: Facebook)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीमुळे जगामध्ये अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले. या महामारीमुळे ज्या क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम झाला ते आहे पर्यटक क्षेत्र (Tourism). कोरोना विषाणू व त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे जागतिक पर्यटन उद्योग पूर्णपणे 'कोसळला' आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे (UN) सरचिटणीस Antonio Guterres मंगळवारी म्हणाले की, कोरोनाच्या साथीमुळे या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत पर्यटन उद्योगाच्या निर्यातीत 320 अब्ज डॉलर्सची तोटा झाले आहे. यासह ते म्हणाले की, पर्यटन उद्योगातील 120 दशलक्ष रोजगार धोक्यात आहेत.

इंधन आणि रसायनांनंतर जागतिक अर्थव्यवस्थेत भर घालणारे पर्यटन हे तिसरे सर्वात मोठे निर्यात क्षेत्र असल्याचे Guterres म्हणाले. सन 2019 मध्ये जागतिक व्यापारामधील पर्यटनामधील वाटा सात टक्के होता. यूएन चीफ पुढे म्हणाले की, पृथ्वीवरील प्रत्येक 10 पैकी एक व्यक्तीला या क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. Guterres असेही म्हणाले की, श्रीमंत विकसित देशांसाठी हा 'मोठा धक्का' आहे, पण विकसनशील देशांना ही आपत्कालीन स्थिती आहे. यामध्ये अनेक लहान बेट, विकसनशील देश आणि आफ्रिकन देशांचा समावेश आहे. (हेही वाचा: 5 वर्षांत 80 देशांतील 250 शहरांचा दौरा; पर्यटनासाठी विकले घरदार)

ते पुढे म्हणाले की काही देशांच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) पर्यटन क्षेत्राचा 20 टक्के पेक्षा जास्त हिस्सा आहे. दरम्यान, सध्या अनेक देशांमध्ये लॉक असल्याने राष्ट्रांच्या सीमा बंद आहेत. इजिप्तने 1 जुलैपासून परदेशी पर्यटकांना पुन्हा देशात येण्याची परवानगी दिली आहे. अशात कोरोनाच्या महामारीमध्ये आतापर्यंत 1 लाखाहून अधिक पर्यटकांनी इजिप्तला भेट दिली आहे. इजिप्तमध्ये तीन महिन्यांच्या निर्बंधानंतर समुद्राच्या किनाऱ्यावरील सर्व रिसॉर्टस सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 1 लाख 26 हजार पर्यटकांनी इथे भेट दिली आहे. पर्यटनमंत्री खालिद अल-अनानी यांनी सोमवारी ही माहिती दिली.