जुलै महिन्यात एकीकडे मान्सूनला सुरुवात होते तर दुसरीकडे अनेक उत्सवांचे रंग चढू लागतात. भारतातील अनेक सण आणि उत्सव हे निसर्गाशी निगडीत असल्याने, देशात मान्सूनच्या काळात अनेक उत्सव साजरे होतात. या पावसाळ्यात तुम्हीही वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित होणाऱ्या उत्सवांमध्ये सहभागी होऊन तिथली संस्कृती, अन्न, काळा आणि इतर बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकता. जुलै महिन्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असल्याने या काळात हवामानही आल्हाददायक असते. चला पाहूया या महिन्यात सुरु होणारे काही उत्सव
अमरनाथ यात्रा -
बाबा अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होईल, आणि 15 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनच्या दिवशी संपन्न होईल. या वेळी ही यात्रा 45 दिवस चालणार आहे. यात्रेसाठी प्रथम जत्था 30 जून रोजी जम्मू स्थित आधार शिविर भगवती नगर येथून निघेल. 1 जुलै रोजी ही यात्रेकरू बालटाल आणि पहलगाम मार्गाने अमरनाथ गुहेकडे मार्गस्थ होईल.
पंढरपूर वारी –
आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात जूनच्या शेवटच्या आठवड्यात वारीला सुरुवात झाली. 22 दिवस चालणारी ही पदयात्रा अनुभवण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक या वारीत सहभागी होतात.
पुरी रथ यात्रा -
फिरण्यासोबतच रंगारंग फेस्टिवलचा आनंद घ्यायचा असेल तर जगन्नाथपुरीचा रथ उत्सव हा अतीशय चांगला पर्याय आहे. 12 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये रथयात्रेसोबत स्थानिक संस्कृतीचेही दर्शन घडते. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढण्याची परंपरा आहे. हा उडीसातील सर्वात प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे. यावर्षी 4 जुलैला हा सोहळा संपन्न होईल.
द्री फेस्टिव्हल -
अरुणाचल प्रदेश आणि अपातानी जातीच्या लोकांचा हा एक महत्त्वाचा कृषी उत्सव आहे. अपातानी लोकांचा हा सर्वात मोठा उत्सव आहे, जो बलिदान आणि त्यागाशी निगडीत आहे. हा उत्सव 5 जुलैला साजरा केला जातो. या उत्सवात लोककथा, पारंपारिक नृत्य आणि विविध प्रकारचे कार्यक्रम सदर केले जातात. (हेही वाचा: पावसाळ्यात आपल्या जोडीदारासह चिंब भिजण्यासाठी महाराष्ट्रातील काही हटके ठिकाणे)
बोनालु महोत्सव -
तेलंगानाच्या विशेष उत्सवांपैकी एक म्हणजे बोनालू उत्सव. प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात हा उत्सव साजरा होतो. या उत्सवामध्ये देवी महाकालीची पूजा केली जाते. बोनालु म्हणजे प्रसाद, देवीने आपल्या पूर्ण केलेल्या इच्छाबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. यावेळी स्त्रिया एकत्र जमून ग्रामीण कलेचे प्रदर्शन करतात.