समोरची व्यक्ती खरं बोलतेय की खोटं ? जाणून घेण्यासाठी ट्राय करा या '5' स्मार्ट ट्रिक्स
खोटं बोलणं (Photo Credits Pixabay)

आजकालच्या मॉडर्न जीवनशैलीत खोटं बोलणे हा एक ट्रेंड झाला आहे. त्यामुळे अनेक लोक दिवसभरात अनेक खोटं बोलतात. खोटं बोलण्याने कोणाचे नुकसान होणार नसेल तर खोटं बोलणं देखील चांगलं. पण अशीही काही लोकं आहेत त्यांना खोटं बोलणं, वागणं अजिबात सहन होत नाही.

काही लोकं तर इतक्या सफाईदारपणे खोटं बोलतात की, त्याचं खोटं पटकन लक्षातच येत नाही. अशावेळी कोण आपल्याशी खोटं बोलतंय, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. कसा? तर या आहेत स्मार्ट ट्रिक्स....

बोलण्यावरुन लावा अंदाज

समोरची व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं, हे तपासून पाहण्यासाठी तुम्हाला त्याच्या बोलण्याकडे, हावभावांकडे नीट लक्ष द्यावे लागेल. सामान्यपणे खोटं बोलणारी व्यक्ती मोठ्या आवाजात बोलते. तर खरं सांगणारी व्यक्ती सौम्य आवाजात बोलते. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे नीट लक्ष दिल्यास ती व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं याचा अंदाज तुम्हाला लागेल.

बॉडी पोश्चर लक्षात घ्या

समोरची व्यक्ती बोलत असताना तिची बॉडी पोश्चर लक्षात घ्या. कोणतीही व्यक्ती जेव्हा खोटं बोलत असते तेव्हा ती आपल्या बॉडी पोश्चरपेक्षा आपल्या बोलण्यावर अधिक जोर देते. एखादी व्यक्ती जेव्हा खोटं बोलत असते तेव्हा तिची जास्त बॉडी मूव्हमेंट होत नाही.

डोळ्यांची हालचाल

एखादी व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं याचा अंदाज त्याच्या डोळ्यांवरुनही येतो. असे लोक डोळ्यात डोळे घालून बोलत नाही. नजरेला नजर देण्यास कचरतात. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल जलद गतीने होत असते. आणि ते सारखे डोळे चोळत राहतात.

चेहऱ्याचे हावभाव

जेव्हा कोणी खोटं बोलत तेव्हा त्याच्या चेहऱ्याचे भाव सतत बदलत राहतात. खोटं बोलणारी व्यक्ती हाताने तोंड झाकण्याचा प्रयत्न करत असते आणि सारखं नाक खाजवत असतात. त्याचबरोबर बोलत असताना मध्येच ओठ चावणे आणि ओठांवरुन जीभ फिरवणे ही देखील खोटं बोलण्याची लक्षणे आहेत.

विषय बदलणे

जर कोणाचे खोटे पकडायचे असेल तर त्याच विषयावर एका मागून एक प्रश्न विचारत राहा. यामुळे खोटं बोलणारी व्यक्ती विषय बदलण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी दुसऱ्या विषयावर बोलायला सुरुवात करेल.