Uttar Pradesh Wedding Drama: घटना आहे लग्नाच्या मंडपात बोहल्यावर अडकलेल्या एका नवरदेवाची. त्याने वयाच्या 40 व्या वर्षी लग्नाचा घाट घातल. संशोधन करुन वधू निवडली. विवाह निश्चित केला. त्यासाठी बोहले घालून मांडवही घातला. आता आपला संसार आनंदात आणि मोठ्या थाटामाटात सुरु होणार या कल्पनेनेच तो रोमांचित झाला. मात्र, आपल्याच वधू (Bride Runs Away) म्हणजेच भविष्यातील बायकोला लघुशंका आल्याने या सर्व प्रकारावर लवकरच पाणी फिरणार आहे, याची सूतराम कल्पनाही त्याला नव्हती. काय घडले नेमके? उत्तर प्रदेश राज्यातील भरोहिया येथील खजनी शिवमंदिरात (Khajni Temple Incident) सुरु विधी सुरु असलेल्या लग्नात (Wedding Fraud) असे काय घडले? ज्यामुळे अवघा परिसर हादरुन गेला. नेमके काय घडले घ्या जाणून.
वधू संशोधनास यश
उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूर येथील गोविंदपूर गावातील शेतकरी कमलेश कुमार हा व्यक्ती दुसऱ्यांदा लग्न करत होता. त्याने नुकतीच पहिली पत्नी गमावली होती. त्यामुळे संसार स्थापन करण्यासाठी तो नव्याने वधुसंशोधन करत होता. दरम्यान, त्याच्या प्रयत्नांना यश आले. त्याला वधू मिळाली. त्याच्यासोबत विवाह करण्यासाठी एका तरुण मुलीने होकार दिला. विशेष म्हणजे हा विवाह निश्चित करण्यासाठी कमलेश कुमार याने मध्यस्थाला कमिशन म्हणून 30,000 रुपये दिले. (हेही वाचा, Bulandshahr Honour Killing: लेकीच्या प्रेमसंबंधांला कंटाळून पित्याकडून लेकीची गोळ्या झाडून हत्या; शेतातच मृतदेह जाळला)
द वेडिंग डे ड्रामा
विवाहाचा दिवस आणि स्थळ ठरले. त्यानुसार कमलेश त्याच्या कुटुंबासह मंदिरात पोहोचला, तर वधू तिच्या आईसोबत होती. कमलेशने दावा केला की त्याने वधूला साड्या, सौंदर्य उत्पादने, दागिने दिले होते आणि लग्नाचा सर्व खर्चही केला होता. दरम्यान, प्रथा-परंपरेस अनुसरुन विवाहाचा विधी सुरु झाला. वधू नटून थटून, दाग-दागिणे घालून विधीसाठी बसली खरी. पण, विधी सुरु असतानाच वधूला नैसर्गिक विधीस जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपणास लघुशंका आल्याचे सांगितले. उपस्थितांनी तिला परवानगी दिल्यानंतर लगेचच ती लघुशंकेस गेली. तिथेच घोळ झाला. लघुशंकेस म्हणून गेलेली वधू म्हणजेच नवरी मुलगी परतलीच नाही. इतकेच नव्हे तर पुढच्या काहीच वेळात तिची आईसुद्धा अचानक लग्नमंडपातून गायब झाली. नवरी आणि वरमाई असलेल्या मायलेकींनी लग्नातूनच पोबारा केल्याने आपली विवाहात फसवणूक झाल्याचे कमलेश यांच्या लक्षात आले.
दागिने आणि रोख रकमेवर डल्ला
कमलेश कुमार यांना वधू पळाल्याने मोठा धक्का बसला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मला फक्त माझ्या कुटुंबाची पुनर्बांधणी करायची होती पण शेवटी मी सर्वकाही गमावले. मी तिला दाग-दागिने आणि साड्या, रोख पैसे असे बरेच काही दिले होते. ते सर्व घेऊन तिने पोबारा केला. माझ्याकडे आताकाहीच शिल्लख नाही. सर्व काही मी गमावले आहे.
पोलीस अधीक्षक (दक्षिण) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, या घटनेबाबत कोणतीही औपचारिक तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. मात्र, कोणी पोलिसांकडे गेल्यास या प्रकरणाचा तपास केला जाईल.
दरम्यान, विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अनेकदा या प्रकारामध्ये एखादे रॅकेट सक्रीय असते. ज्यामुळे एजंट गाठून लग्न लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला जातो. धक्कादायक म्हणजे नागरिकही या एजंटवर विश्वास ठेवतात. आणि अनोळखी मुलगी आणि कुटुंबीयांसोबत विवाहाच्या नावाखाली मोठी गुंतवणूक करतात. ज्यामुळे या वधू घरातील सोने-नाणे, दाग-दागिने हाती लागेल तो मौल्यवान ऐवज सोबत घेऊन पोबारा करतात.