आई-वडिल होणं सोपं नाही, कसा अनुभवाल तो नऊ महिन्यांचा अद्भूत प्रवास? वाचा सविस्तर
Pregnancy (Photo Credits: PixaBay)

घरात जेव्हा नवा पाहुणा येणार याची चाहुल लागते, तेव्हा घरातील वातावरण काही औरच असते. नव्या पाहुण्याच्या म्हणजेच चिमुकल्याच्या स्वागतासाठी आजी-आजोबा, मावशी, काका,काकी, आत्या सर्वच जोरात तयारी लागतात. मात्र या सर्वांमध्ये ज्या जोडप्याने ही गुड न्यूज दिली असते त्यांना नव्या पाहुण्याची जितकी आतुरता असते तितकीच त्यांच्यावर येणा-या जबाबदारीची जाणीवही. अशा वेळी पत्नीचे नऊ महिने हा खूप महत्त्वाचा काळ असतो. त्या काळात न केवळ पत्नीचे मूड स्विंग होतात तर पतीचे ही मूड स्विंग होत असतात. अशा वेळी पतीने आणि पत्नीने कोणती विशेष काळजी घ्यावी आणि तो 9 महिन्यांचा सुंदर प्रवास कसा अनुभवा याविषयी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

पतीने घ्यावयाची विशेष काळजी:

1. जेव्हा तुम्हाला तुमची पत्नी ही गोड बातमी सांगते तेव्हा तिचे अभिनंदन करा. ती तुमच्यासाठी किती मोठी गोष्ट करणार आहे याची तिला जाणीव करुन द्या, जेणेकरुन पत्नीला आपण आई होणार असल्याने आलेले टेन्शन थोडे कमी होईल.

2. पत्नी सोबत डॉक्टरांना भेटण्यासाठी स्वत: जा. जेणेकरुन पत्नीला वाटेल आपला जोडीदार या क्षणी सुद्धा आपल्या सोबत आहे. कारण ब-याचदा महिलांची अशी समजूत होते की, आता आपण आई बनणार म्हणजे आपण स्थूल होणार, त्यामुळे आपला जोडीदार आपल्याकडे दुर्लक्ष करेल.

3. सोनोग्राफीसाठी डॉक्टरांकडे जायचे असेल तेव्हा पतीनेही तिच्यासोबत जावे. कारण डॉक्टर जेव्हा आपल्याला आपल्या पत्नीच्या गर्भातील बाळाच्या हृद्याचे ठोके अल्ट्रा साउंडच्या माध्यमातून तुम्हाला ऐकवतात तो अनुभव काही औरच असतो. कदाचित तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की तुमची पत्नी पुढील नऊ महिने कोणते मोठे शिवधनुष्य पेलणार आहे ते.

4. पत्नीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तिला बाहेर फिरायला घेऊन जा. तिला काही खावेसे वाटत असेल तर ते खाऊ द्या. तसेच गर्भवती असताना महिलेची भूक वाढते म्हणून तिच्या नकळतपणे सुद्धा तू जाडी होणार किंवा तू आता पहिल्यासारखी नाही दिसणार असे हिणवू नका. त्यामुळे गर्भवती महिलेचे मनोबल कमी होऊ शकते.

5. गर्भावस्थेत (Pregnancy) महिला आपल्यासोबत गर्भात आणखी एका जीवाला घेऊन वावरत असते. त्यामुळे तिच्या त्रासाची आपण कल्पना न केलेलीच बरी. अशा वेळी तुम्ही तुमच्या पत्नीला कधी कधी घरकामात मदत केली तरी हरकत नाही.

6. गर्भावस्थेत महिलांचे अनेकदा मूड स्विंग होत असतात. अशा वेळी कधी कधी त्या चिडचिड देखील करतात. मात्र अशा वेळी पतींनी त्या कडे कानाडोळा करत आपल्या पत्नीचा मूड कसा चांगला ठेवता येईल याकडे लक्ष द्या.

7. प्रसूती वेळी तिच्या सोबत राहा. जेणेकरुन आपण एकटे नसून प्रसूती कळांसारखे मोठे दिव्य ती अगदी सहजपणे पार करेल.

पत्नीने घ्यावयाची विशेष काळजी:

1. जेव्हा तुम्ही तुमच्या पतीला ही गोड बातमी द्याल तेव्हा तुमच्या पतीचेही अभिनंदन करा. सर्वांनी आपलेच कौतुक करावे असा हट्ट ठेवू नका. पतीचे अभिनंदन केल्याने त्यालाही खूप बरे वाटेल.

2. नवा पाहुणा येणार म्हटलं की संपुर्ण घर हा त्या गर्भवती महिलेकडेच जास्त लक्ष देतो. अशा वेळी पत्नीने आपल्या पतीकडे विशेष लक्ष द्या. जेणेकरुन पतीला आपण एकटे पडल्याची भावना निर्माण होणार नाही.

3. डॉक्टरांना भेटण्यासाठी जात असताना एखादे वेळेस आपल्या पतीस कामामुळे नाही येता आले तर त्याच्यावर चिडचिड करु नका. कारण त्याचा परिणाम त्याच्या कामावर होऊ शकतो. नेहमीच तो आपल्या सोबत पाहिजे असा हट्ट नको.

4. गर्भावस्थेत पती शक्य तितके तुमचे हट्ट पुरविण्यासाठी प्रयत्न करत असतो, अशा वेळी एखादा हट्ट पुर्ण केला नाही तर त्याला दूषणे लावू नका. त्यासाठी त्याचे मागे लागू नका.

5. जेव्हा आपली पत्नी आई होणार असे पतीला कळते तेव्हा त्याच्या मनात नेहमी हीच भीती असते की, आता आपल्या पत्नीचे आपल्यावरील प्रेम कमी होणार. तिचे सारे लक्ष त्या नव्या पाहुण्याकडे असणार. अशावेळी पत्नीने आपण सोबत आहोत आणि राहणार अशी पतीला वारंवार जाणीव करुन द्या.

6. पतीला आपली पत्नी गर्भवती असताना अनेकदा सेक्स करण्याची इच्छा होते, मात्र तिच्या त्या अवस्थेमुळे ते करता येत नसल्याकारणाने त्याची चिडचिड होते. अशावेळी पत्नीने शक्य तितके शारीरिक संबंध ठेवण्यास काही हरकत नाही.

हेही वाचा- Pregnancy च्या वेळी महिलांनी Diet वर खास लक्ष द्या!

असं म्हणतात स्त्री ही बाळाला नऊ महिने पोटात तर पुरूष डोक्यात ठेवतो. थोडक्याच आई ही बाळाला जगात आणते तर वडिल त्या बाळाला जग दाखवतो. त्यामुळे आई-वडिल या दोघांची जबाबदारी समसमान आहे. जो त्रास आईला नऊ महिने होतो तोच त्रास वडिल बाळाच्या भविष्यासाठी पुढे सहन करत असतो. एकूणच काय आई-वडिल होणं सोप नाही. पण या सर्व गोष्टींचा सखोल विचार केला तर ते अवघडही नाही. बरोबर ना!

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)