ब्रिटीश सत्तेच्या कालखंडात हिंदू समाजाच्या रुढी परंपरांविरोधात अनेक सुधारकांनी आवाज उठवला. त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमतीवय, बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर ज्योतिबा फुलेंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले. महात्मा फुले यांनी 1851 मध्ये मुलींसाठी शाळा सुरु केली. 5 हजार वर्षांच्या इतिहासातील ती मुलींसाठी पहिली शाळा होती. त्यानंतर लगेचच त्यांनी अस्पृश्यांकरीता शाळा सुरु केली. अस्पृश्य स्त्रियांकरीता त्यांनी 6 शाळा चालविल्या. 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला. तर 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांनी या जगाला निरोप दिला. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्यांचे काही निवडक विचार.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा फुले
नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे - महात्मा फुले
जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील - महात्मा फुले
कोणताही 'धर्म' ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि 'चातुर्वण्य' व 'जातिभेद' ही निर्मिती मानवाचीच आहे. - महात्मा फुले
जे कोणी आपले कुटुंब, भाऊबंद, सगेसोयरे, इष्टमित्र आणि साथीदारांना आपल्यासह श्रेष्ट मानून इतर कोणाही स्त्री-पुरुषांस किंवा एकंदर मानव प्राण्यास पिढीजातपणे अथवा कपटाने अपवित्र किंवा नीच मानत नाहीत त्यास 'सत्यवर्तनी' म्हणावे. - महत्मा फुले
सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती. - महात्मा फुले
स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो
कधी जातीचा तर कधी धर्माचा
धर्म महत्त्वाचा नाही
माणुसकी असली पाहिजे - महात्मा फुले
स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय - - महात्मा फुले
ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेली सत्यशोधक समाज ही संस्था भारतीय समाजातील क्रांतीकरीता प्रयत्न करणारी अग्रणी संस्था ठरली. समाजातील त्यांच्या भरीव कार्यामुळेच महात्मा गांधी यांनी ज्योतिबांना 'खरा महात्मा' असे म्हटले असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील फुलेंना आपले गुरु मानतात.