Human Body (Photo Credits: File Photo)

जगभरामध्ये 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे (World Heart Day ) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी जनसामान्यांमध्ये विशेष जनजागृती केली जाते. हृद्य हा मानवी शरीरातील महत्त्वाच्या एका अवयवांपैकी आहे. त्यामुळे त्याचं आरोग्य जपणं महत्त्वाचं आहे. आजकाल दगदगीच्या झालेल्या जीवनामध्ये हृद्यावर अनेक गोष्टींचा दुष्परिणाम होत आहे. अशातच आता कोरोना व्हायरसचं संकट असल्याने कमजोर हृद्याच्या रूग्णांसाठी या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोना व्हायरस फुफ्फुसांसोबतच हृद्यावरदेखील गंभीर परिणाम करत असल्याने कोरोना व्हायरसच्या संसर्गावर मात केलेल्या रूग्णांनाही पुढील काही दिवस काळजी घेणं आवश्यक आहे. अचानक आलेल्या हृद्यविकाराच्या झटक्याने जगभरात अनेक रूग्णांचा जीव जातो. त्यामुळे याविषयी वेळोवेळी आरोग्याकडून देण्यात येणार्‍या संकेताकडे प्रत्येकाने लक्ष दिले तर जीवघेणा हृद्यविकाराचा झटका रोखण्यास मदत होऊ शकते. कोरोना व्हायरस चा तुमच्या हृदयावर परिणाम होतो का? जाणून घ्या काय आहे रिपोर्ट.

 

दरम्यान हृद्यविकारांमध्ये जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होऊन रक्तप्रवाह खंडीत होतो तेव्हा हृद्यविकाराचा झटका येतो. त्यामुळे ही घटना एका क्षणाची नसून अनेक महिन्यांचा, दिवसांचा आरोग्यावरील परिणाम असतो. मग वेळीच त्याचे संकेत ओळखण्यासाठी या काही लक्षणांकडे जरूर लक्ष द्या

श्वास घेण्यास त्रास

काही पावलं चालल्यानंतर दम लागणं, पायर्‍या चढताना दम लागणं, कष्टाचं काम केल्यानंतर त्रास होणं या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. हृद्याला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने लहान लहान कामामधून देखील दम लागणं, श्वास घेण्यास त्रास होणं अशा समस्या उद्भवू शकतात. अनेकदा यामधून चक्कर येणं, गरगरणं अशी लक्षणं सातत्याने जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अंगदुखी

हद्यविकाराचा झटका केवळ हृद्याच्या आरोग्यावर परिणाम करणारा असला असं वाटत असलं तरीही अनेकदा डाव्या हाताला वेदना होणं, छातीपासून मानेपर्यंत वेदना जाणवणं, पोटात दुखणं, जबड्याच्या भागाजवळ वेदना या हृद्यविकाराचे संकेत देतात.

अस्वस्थ वाटणं

अस्वस्थ वाटणं हे अगदीच सामान्य लक्षण असल्याने अनेकजण ते इतर आजारांचं समजून दुर्लक्षित करतात. मात्र सकाळी उठताच तुम्हांला कोल्ड स्वेट, हाता-पायाला घाम सुटणं, मळमळणं अशी लक्षणं जाणवत असल्यास ते हृद्यविकार संकेत असू शकतात.

छातीत दुखणं

अधून मधून छातीत दुखणं, छातीत भरून आल्यासारखं वाटणं ही तुमचं हृद्याचं आरोग्य धोक्यात असल्याचं संकेत देतात. याकडे वेळीच लक्ष द्या. हळूहळू हा त्रास वाढू शकतो आणि जीवघेणा ठरू शकतो.

दरम्यान नियमित वर्षाला एकदा शरीराची संपूर्ण चाचणी करून घ्या. आजार बळावण्याची वाट बघत बसू नका. हृद्यविकारांमध्ये हळूहळू शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे शरीर तुम्हांला देत असलेले संकेत दुर्लक्षित करू नका. काही त्रास होत असल्यास तो अंगावर काढण्याची किंवा स्वतःच्या मनाने औषधं घेण्याची सवय लावून घेऊ नका ते आजारपणापेक्षा अधिक धोकादायक आहे.