Sunil Kedar Health Update: सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, सोमवार पर्यंत रूग्णालयातच राहण्याची शक्यता

आज सुनील केदार यांचा सीटी स्कॅन, एमआरआय देखील होणार आहे.

Sunil Kedar Health Update:  सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, सोमवार पर्यंत रूग्णालयातच राहण्याची शक्यता
सुनील केदार बँक घोटाळा प्रकरणात दोषी | (Photo credit: archived, edited, representative image)

कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मायग्रेनचा (Migraine) त्रास होत असल्याने शुक्रवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. केदार यांचा इसीजी देखील काढण्यात आला असून त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचा ईसीजी अ‍ॅबनॉर्मल असल्याने अजून काही चाचण्या घेऊन त्यांच्यावर पुढील उपचार ठरवले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बॅंक घोटाळ्यात 5 वर्षांची शिक्षा झालेल्या सुनील केदार यांचा मुक्काम हॉस्पिटलमध्येच असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान आज सुनील केदार यांचा सीटी स्कॅन, एमआरआय देखील होणार आहे. सुनील केदार यांना  नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांचा तुरूंगवास आणि साडेबारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर रात्रीच त्यांना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकल रुग्णालयात नेले असता त्यांनी प्रकृती संदर्भात काही तक्रारी डॉक्टरकडे केल्या होत्या. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.  रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केदार यांची ईसीजी, इको, रक्तासह मेंदूशी संबंधित बऱ्याच चाचण्या झाल्या. सध्या हॉस्पिटलबाहेर पोलिस बंदोबस्त देखील आहे.

2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी शेअर्स खरेदी केले होते. पुढे या कंपन्यांकडून बँकेला खरेदी केलेले शेअर्स मिळाले नाही, ते व्यवहार बँकेच्या नावाने झाले नव्हते. धक्कादायक म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या.  या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे.तेव्हा फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे CID कडे या प्रकरणाचा तपास गेला.  तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता. आता मंगळवारी (26 डिसेंबरला) सुनील केदार यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2023 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).