#WorldFoodDay : अन्नाची नासाडी टाळत #ZeroHunger चं ध्येय गाठण्यासाठी या 5 सवयी करतील मदत
जागतिक अन्न दिन (Photo Credits: Pixabay)

जगभरात 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात अन्नाच्या अभावामुळे भूकबळी आणि कुपोषणचं प्रमाण वाढलं आहे. संयुक्त राष्ट्र आणि फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या मदतीने येत्या 2030 पर्यंत जगाला #ZeroHunger कडे नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

भारताचा ग्लोबल हंग़र इंडेक्सही निराशाजनक आहे. 119 देशामध्ये भारत 103 व्या स्थानावर आहे. मागील वर्षी भारत 100 व्या स्थानी होता. यंदा क्रमवारीत झालेली घसरण चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हा उपक्रम सुरू झाला असला तरीही प्रत्येकाने स्वतःपासून सुरूवात केल्यासच भविष्यात आपण जगातून भूकबळी कमी करू शकतो.

1. गरजेपुरता अन्न घ्या आणि शिजवा

तुम्हांला गरज आहे तितकेच अन्न, भाज्या विकत घ्या. नीट साफ करून टिकतील अशा स्वरूपात भाज्या ठेवा. फ्रीजमध्ये फार काळ टिकवून किंवा पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याची सवय आरोग्याला त्रासदायक आहे. मात्र 1-2 दिवस टिकेल अशा प्रकारे अन्न तुम्ही फ्रीजमध्ये नक्कीच साठवू शकता.

2.उरलेले पदार्थ फेकू नका

शिजवलेले अन्न फेकणं टाळा. उरलेल्या भाजी, पोळी, भातापासून काही नव्या पदार्थांची निर्मिती करा. फोडणीचा भात, फोडणीची पोळी, पोळीचा लाडू असे पदार्थ पोषक असतात.

3. अन्न दान करा

दान हे पुण्याचं काम आहे. त्यामुळे भूकेलेल्याला अन्न दान करा. घरामध्ये, लग्न सोहळ्यामध्ये खूप प्रमाणात अन्न राहिले असल्यास गरजवंताला ते दान करणं अधिक फायद्याचं आहे. अनेक शहरामध्ये अन्न दान करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी अनेक संस्था काम करत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून अन्न दान करा.

4. जेवणाचेही संस्कार द्या

घरात प्रत्येकाला भूक असेल त्याप्रमाणेच जेवण बनवण्याची प्रथा सुरू करा म्हणजे मोजकेच अन्न बनवल्याने ते वाया जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जेवण वाढतानाही हौसेपायी भरपूर वाढणं टाळा. प्रत्येकाला स्वेच्छेने हवे तितकेच अन्न वाढा. तसेच वाढलेले सारे अन्न संपवल्याशिवाय जेवण्याच्या ताटावरून उठू नये असा नियम बनवा. हॉटेलमध्येही उरलेले अन्न फेकण्यापेक्षा पार्सल करून घ्या. शक्य असल्यास दुसर्‍यादिवशी गरम करून खावे किंवा रस्त्यामध्ये गरजवंताला द्यावे.

5. एक्सपायरी डेट तपासून पहा

पदार्थ घेतल्यानंतर त्याची एक्सपायरी डेट लक्षात ठेवा. त्या तारखेपूर्वीच अन्नपदार्थ संपवा अन्यथा ते जसेच्या तसे फेकून द्यावे लागतात.