World Diabetes Day 2019: ब्रेकफास्ट टाळणं ते मासे न खाणं  या '5' सवयी ठरू शकतात मधुमेहाची कारणं
Diabetes (Photo Credits: Pixabay)

आजकाल धावपळीच्या झालेल्या जीवनशैलीमध्ये नकळत आपण काही चूकीच्या सवयींच्या आहारी जात आहोत. यामधूनच लाईफस्टाईलच्या निगडीत अनेक आजार वाढत आहेत. यापैकी एक म्हणजे मधुमेह! भारत देशाची ओळख मधुमेहींची राजधानी म्हणून होत आहे. म्हणुनच 'सायलंट किलर' अशी ओळख असणार्‍या या आजाराविषयी यंदा 'वर्ल्ड डायबिटीस डे '(World Diabetes Day) च्या निमित्त जाणून घ्या या गंभीर आजाराबद्दल. कारण नेहमीच्या आयुष्यात लहान सहान वाटणार्‍या या गोष्टी मधुमेहाचं कारण आहेत. त्यामुळे या सवयींचा तुम्हांला मोह असेल तर त्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही देखील मधुमेहाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे.

ब्रेकफास्ट टाळणं

दिवसभरातील तुमच्या आहारात ब्रेकफास्ट म्हणजेच तुमचा नास्ता हा महत्त्वाचा असतो. अनेकदा सकाळी कामं आवरून बाहेर पडण्याची घाई असल्याने अनेकजण ब्रेकफास्ट म्हणजेच नास्ता टाळतात. सातत्यानं सकाळचा नास्ता टाळणं यामुळे इन्सुलिनच्या पातळीमध्ये चढउतार होण्याची शक्यता वाढते. सकाळी उठल्यावर नास्ता न केल्याने दुपारच्या वेळेस अति जेवण केले जाते. दिवसभर खाण्याच्या वेळांमधील चक्र बिघडते.

भाज्यांचा आहारात समावेश टाळणं

शरीराचं संतुलन राखण्यासाठी पोषक आहार गरजेचा आहे. त्यामुळे आहारात मायक्रोन्युट्रियंट, अ‍ॅन्टिऑक्सिडंट्स, फायबर यांचा समावेश करणं आवश्यक आहे. भाज्यांचा समावेश केल्याने शरीरात इन्सुलिन अचानक उसळण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मधूमेहाचा धोका कमी होतो.

आहारात हेल्दी मासांहार आवश्यक

अनेकदा मांसाहारी लोक चिकन, मटण यांच्यावर ताव मारतात. मासे खाणं टाळणं संतुलित आहाराच्या दृष्टीने त्रासदायक आहे. माशांमध्ये चांगल्या दर्जाची प्रोटिन्स आहेत. वजन आटोक्यात ठेवण्यासाठीदेखील मासे फायदेशीर आहेत. मासे तळून खाणं टाळा. वाफावलेल्या स्वरूपात माशांचा आहारात समावेश करणं यामधून ओमेगा 3 मिळते. कार्डिओव्हस्क्युलर आजार आणि मधुमेहाचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्यामुळे भाज्यांसोबतच मांसाहाराचा आनंद घेताना आहारात मासे देखील समाविष्ट करा.

वेळेवर न झोपण्याची सवय

अनेकदा दिवसभर 9-10 तास काम केल्यानंतर रात्री उशीरा घरी आल्यानंतर आराम करता करता वेबसीरीज पाहणं, मित्र मैत्रिणींशी चॅटिंग करणं अशा सवयींमुळे जागरण करण्याची सवय लागते. यामुळे नकळत झोपण्याची वेळ कमी होते आणि शरीरावर त्याचे वाईट परिणाम दिसायला सुरूवात होते. अनियमित झोपण्याची सवय असल्यास मधुमेहासोबत लाईफस्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे उशीरा झोपण्याची, जागरणं करण्याची आणि त्यासोबतच सकाळी उशिरा उठण्याची सवय टाळा.

व्यायाम टाळणं

तुम्ही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी करत नसाल, व्यायाम करण्याचा कंटाळा येत असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. व्यायाम करण्यासाठी तुम्हांला जीममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. घरच्याघरी व्यायाम, योगासनं करणं देखील पुरेसं आहे. केवळ दिवसभरातून 20 मिनिटं काढा आणि केवळ चालण्याचा किंवा हार्ट पम्पिंग अ‍ॅक्टिव्हिटी केल्यानेही तुमचा दिवस उत्तम जाईल.

धकाधकीच्या बनत चाललेल्या तुमच्या जीवनात आजकाल काम, पैसा आणि इतर मोहांच्या मागे धावता धावता तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडेच लक्ष देत नाही हे आपण नकळत विसरत आहोत. तसेच मधुमेह हा अनुवंशिक आजार असल्याने तुमच्या चूकांमुळे हा आजार पुढच्या पिढीकडेही जात आहे. त्यामुळे त्याला वेळीच रोखणं आवश्यक आहे.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)