World Cancer Day 2021: कर्करोग बरा होतो का? 'जागतिक कर्करोग दिना'निमित्त जाणून घ्या भारतात होणाऱ्या 5 सामान्य कर्करोगाच्या प्रकाराविषयी
प्रतिकात्मक फोटो ( photo credti : pixabay )

World Cancer Day 2021: कर्करोग हा सध्याच्या युगातील सर्वात भयानक शब्द बनला आहे. गेल्या काही वर्षांत केवळ भारतातचं नव्हे तर जगभरात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, कर्करोगाचा कोणताही इलाज नाही. परंतु कर्करोग तज्ञांच्या मते कर्करोगावरील इजाल शक्य आहे. गुड़गांव मधील मेदांता रुग्णालयाचे (Medanta Hospital) कर्करोग सर्जन डॉ. के. हांडाच्या मते, जर आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल माहिती असेल आणि शरीरातील कोणत्याही लहान समस्यांकडे दुर्लक्ष न केल्यास आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधल्यास आपण कर्करोगाचा पराभव करू शकतो. 1993 मध्ये, कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूची संख्या दरवर्षी 70 लाखांपेक्षा जास्त वाढू लागली, तेव्हा कर्करोगाच्या नियंत्रणावरील आणि उपचारासाठी लोकांना जागृत करण्यासाठी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल नावाची संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेने 4 फेब्रुवारी 1993 रोजी पहिल्यांदा जिनिव्हा येथे 'जागतिक कर्करोग दिन'चे आयोजन केले. यानंतर दरवर्षी 'वर्ल्ड कॅन्सर डे' साजरा केला जाऊ लागला.

कर्करोगाचे विविध प्रकार आहेत. परंतु, जगामध्ये सर्वात जास्त तंबाखूपासून होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, जगभरात तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाने मरण पावलेल्या लोकांची संख्या सुमारे 63 टक्के आहे. भारतात कर्करोगाच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. भारतात कर्करोगाचे मुख्य पाच प्रकार आढळतात. यात स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, सर्वाइकल कर्करोग आणि पोटाच्या कर्करोगाचा समावेश आहे. (वाचा - Dragon Fruit Health Benefits: रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते ड्रॅगन फ्रूट; हिवाळ्यात नक्की करा सेवन)

स्तनाचा कर्करोग? (Breast Cancer)

भारतात स्तनाचा कर्करोग होण्याचे (अंदाजे 1,62,000) सर्वाधिक प्रमाण आहे. स्तनातील कोणत्याहीप्रकारची गाठ, त्वचेत बदल, स्तनाग्रांच्या आकारात बदल, स्तन कडक होणे, स्तनाग्रातून रक्त किंवा द्रव येणे किंवा स्तनामध्ये वेदना जाणवणे अशा तक्रारींमुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. सामान्यत: स्तनाचा कर्करोग धूम्रपान, मद्यपान, प्रथम गरोदरपणात उशीर, मुलांना स्तनपान न देणे, गर्भनिरोधक औषधांचा जास्त प्रमाणात किंवा अनुवांशिक कारणामुळे होऊ शकतो. कर्करोग तज्ज्ञांच्या मते, स्तनांच्या कर्करोगाचा वेळेत उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो. परंतु, वरील समस्या जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

तोंडाचा कर्करोग - (Oral Cancer)

तोंडाच्या कर्करोगामुळे ओठ, जीभ, गाल, तोंडातील टाळू, हिरड्या आणि तोंडाच्या वरच्या भागात कॅन्सर होऊ शकतो. तोंडाचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखू, मद्यपान, रासायनिक धूळ, व्हिटॅमिन बी आणि डीची कमतरता, असंतुलित आहार आणि मानवी पॅपिलोमा विषाणूचा संसर्ग. जे लोक धूम्रपान करतात, गुटखा खातात किंवा मद्यपान करतात त्यांना तोंडाच्या कर्करोगाचा धोका असतो. तोंडाचा कर्करोग होणारे रुग्ण भारतात सर्वाधिक आहेत. सतत खोकला, कान दुखणे, घसा खवखणे, तोंड, गाल आणि जीभेवरील जखम बरी न होणे, अन्न गिळण्यास अडचण, तोंडात सतत जखमा होणे, आदी तोंडाच्या कर्करोगाचे लक्षणं असू शकतात. वरील कोणतीही लक्षणं दिसल्यास ENT तज्ञाचा सल्ला घ्या.

फुफ्फुसांचा कर्करोग - (Lung Cancer)

फुफ्फुसांचा कर्करोग हा जागतिक स्तरावर कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी एक आहे. पुरुष आणि स्त्रियांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग आढळतो. 40 वर्षांखालील लोकांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग क्वचितच दिसून येतो, परंतु वाढत्या वयानुसार त्याची शक्यता वाढते. 90 टक्के लोकांना धूम्रपान केल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होतो. परंतु डॉ. के के हांडा यांच्या मते असे लोक आहेत, ज्यांनी आयुष्य कधीही धूम्रपान केलेले नाही. परंतु, तरीदेखील ते कर्करोगाचे बळी ठरले आहेत. तंबाखू किंवा धूम्रपान व्यतिरिक्त आर्सेनिक, युरेनियम, एस्बेस्टोस किंवा रेडॉन सारख्या अवजड धातूंच्या संपर्कामुळे देखील फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो. याशिवाय प्रदूषणामुळे 45 ते 55 वर्षे वयोगटातील भारतीय महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग झपाट्याने वाढत आहे.

गर्भाशयाचा कर्करोग - (Cervical Cancer)

एका अहवालानुसार, गर्भाशयाच्या कर्करोगाने दरवर्षी सुमारे 74 हजार महिलांचा मृत्यू होतो. यामागे गर्भाशय कर्करोगाची तपासणी न करणे हे एकमेव कारण आहे. गर्भाशयाच्या पेशींच्या अनियमित थरामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो. गर्भाशय कर्करोगाला ग्रीवाचा कर्करोग असेही म्हणतात. जेव्हा गर्भाशय ग्रीवाच्या पातळीमध्ये असामान्यपणे वाढते तेव्हा याचा धोका वाढतो. हे गर्भाशयाच्या खालच्या पातळीवर परिणाम करते. गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग अनेक कारणांमुळे होऊ शकतो. लहान वयातच लैंगिक संबंध ठेवणे, जास्त प्रमाणात औषधे घेणे, धूम्रपान करणे किंवा मद्यपान करणे, लहान वयातचं मुलाला जन्म देणे, मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक औषधे घेणे इत्यादी कारणांमुळे गर्भाशयाच्या कर्करोग होऊ शकतो. रक्तस्त्राव, लैंगिक संबंधात अडचण, जास्त लघवी होणे, खूप थकवा जाणवणे, जननेंद्रियाचा वास येणे इ. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे मुख्य लक्षणं असू शकतात.

पोटाचा कर्करोग - (Stomach Cancer)

पोटाचा कर्करोग झाल्यास पोटाच्या कोणत्याही भागात पेशीची वाढ होते. पोटाचा कर्करोग झाल्याचे वेळेत समल्यास त्याच्यावर उपचार शक्य आहे. डॉ. हांडा यांच्या म्हणण्यानुसार, गॅस्ट्रिक कर्करोगात, पोटातील अंतर्गत भागाच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांपेक्षा पोटाचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो. जेवणावेळी पोट भरल्यासारखं वाटणं, छातीत आणि ओटीपोटात वेदना, गिळण्यास त्रास होणे, छातीत जळजळ, अपचन समस्या आदी पोटाच्या कर्करोगाची लक्षणं आहेत.