प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

गेल्या काही वर्षात भारतात मुलींचं प्युबर्टीचं वय कमी झालं आहे. म्हणजेच मुली लवकर वयात येऊ लागल्या आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरातील सुमारे 80% मुली 11 व्या वर्षी वयात येतात.

मासिक पाळी सुरु होण्यापूर्वी मुलींना त्याबद्दल योग्य माहिती असणे गरजेचे आहे. यासंदर्भात आईने मुलींशी संवाद साधायला हवा. पण अनेकींना मुलींना नेमके काय आणि कसे सांगावे, असा प्रश्न पडतो. त्यासाठी या काही टिप्स ज्यामुळे मासिक पाळीबद्दल मुलींशी संवाद साधणे सोपे होईल.

मुलीच्या प्रश्नांची नीट उत्तरे द्या

मासिक पाळीबद्दल मुलीशी बोलण्यासाठी निवांत वेळ काढा आणि तुम्ही दोघीच घरी असताना त्याबद्दल तिच्याशी बोला. त्यामुळे मुलीलाही कंफर्टेबल वाटेल. मासिक पाळी म्हणजे काय?, त्यावेळेस नेमकं काय होतं?, यांसारख्या सर्व गोष्टी नीट समजावून सांगा. तिने विचारलेल्या प्रश्नांची मोकळेपणाने, स्पष्ट उत्तरे द्या. गरज भासल्यास तुम्ही डॉक्टरांचीही मदत घेऊ शकता. त्याचबरोबर मुलीचे वय लक्षात घेऊन तिला अनावश्यक गोष्टी सांगणे टाळा.

सॅनिटरी पॅडचा योग्य वापर

मासिक पाळीबद्दल सांगितल्यानंतर सॅनिटरी पॅडचा योग्य वापर कसा करायचा याबद्दलही मुलींना माहिती देणे गरजेचे आहे. अनेक मुलींना सुरुवातीला पॅड लावणे जमत नाही. त्यामुळे ते दाखवणे गरजेचे आहे. तसंच पिरियडची तारीख लक्षात ठेवण्याबाबत मुलींना सांगा.

पिरियड बॅग

एका लहानशा बॅगमध्ये एक सॅनिटरी पॅड आणि एक्स्ट्रा पॅन्टी घालून मुलीसाठी पिरियड बॅग तयार करा. ती बॅग स्कूल बॅगमधून शाळेत नेणे सोपे होईल. त्याचबरोबर शाळेत पिरियड आल्यानंतरही मुली घाबरुन, गांगरुन जाणार नाहीत.

खूप अधिक माहितीही ठरेल धोकादायक

मुलींना मासिक पाळीबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. पण गरजेपेक्षा अधिक माहितीही घातक ठरेल. कारण विनाकारण मुली घाबरु शकतात. त्यामुळे पहिल्यांदा बोलताना सर्वच सांगू नका. शरीरात होणारे बदल तिला अनुभवू द्या.

स्वच्छता

मासिक पाळीदरम्यान स्वच्छता कशी राखायची, हे मुलींना नीट समजावून सांगा. त्याचबरोबर नॅपकीन कसा डिस्पोज करायचा याबद्दल माहिती द्या. त्वचेला होणारे इंफेक्शन, रॅशेस टाळण्यासाठी काय करावे, नॅपकिन कधी आणि किती वेळा बदलावा, हे देखील नीट समजावून सांगा.