
स्वाईन फ्लू चे (Swine Flu) व्हायरस पावसाळ्यानंतर थंडीत सर्वाधिक अॅक्टीव्ह होतात. यापूर्वी देशात स्वाईन फ्लू चे अनेक बळी गेले आहेत. देशात स्वाईन फ्लू पसरत असताना काही खास नियमांचे पालन केल्यास त्यापासून बचाव होऊ शकतो...
स्वाईन फ्लूची लागण इन्फ्लूयएंजा ए (H1N1 Influenza) या व्हायरसमुळे होते. अशा प्रकारचा व्हायरस डुक्करांमध्ये आढळून येतो. त्यामुळे या आजाराला 'स्वाईन फ्लू' म्हणतात. याचा पसार अत्यंत जलद गतीने होतो.
इतकंच नाही तर पोर्क (डुक्कराचे मांस) खाल्याने हा रोग होऊ शकतो. त्याचबरोबर स्वाईन फ्लू ने ग्रस्त लोकांच्या खोकल्याने आणि शिंकण्याने हा आजार पसरतो. रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूचे इंफेक्शन एक ते सात दिवस राहते.
स्वाईन फ्लू ची लक्षणे
ताप येण्यासोबत सर्दी, घसा सुजणे, छातीत कफ जमा होणे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास H1N1 ची तपासणी जरुर करा. त्याचबरोबर तीन दिवसांपेक्षा अधिक वेळ 101 डिग्रीवर ताप असल्यास, थकवा जाणवत असल्यास, भूक कमी लागत असल्यास त्याचबरोबर उलटी होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्वाईन फ्लू पासून बचावात्मक उपाय
# खोकताना किंवा शिंकताना तोंडावर-नाकावर रुमाल ठेवा.
# हात साबण आणि पाण्याने नियमित स्वच्छ करा.
# शक्यतो गर्दीत जाणे टाळा.
# स्वाईन फ्लूची लागण झाली असल्यास घराबाहेर पडणे टाळा. घरातच आराम करणे योग्य ठरेल.
# फ्लू ची लागण झालेल्या व्यक्तीपासून लांब राहणेच योग्य ठरेल.
# पुरेशी झोप घ्या आणि आराम करा. भरपूर पाणी प्या आणि पोषक आहार घ्या.
# लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हे करणे टाळा
# सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
# अस्वच्छ हाताने डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे.
# अनोळखी व्यक्ती किंवा इंफेक्शन झालेल्या व्यक्तीला मिठी मारणे किंवा हात मिळवणे.
# डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे.
# वापरलेले नॅपकिन्स, टिशू पेपर इत्यादी वस्तू मोकळ्या जागी फेकणे.
# फ्लू व्हायरसने दूषित झालेल्या वस्तूंना स्पर्श करणे.
# सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे.
देशभरात स्वाईन फ्लू पसरत आहे. राजस्थान, गुजरात, दिल्ली, हरयाणा या राज्यात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या वाढताना दिसत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना देखील अलिकडेच स्वाईन फ्लूची लागण झाली होती. देशभरात स्वाईन फ्लू फोफावत असताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.