डीप्रेशन: तरुणाईला सोसवेना 'सोशल मीडिया'चा भार; अनेक वेडेपीसे, काहींवर उपचार सुरु
सोशल मीडिया (संग्रहित प्रतिमा)

'सोशल मीडिया', खास करुन फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पडीक असणाऱ्या मंडळींचे आमाप पीक गेल्या काही काळात इंटरनेटवर आले आहे. ही मंडळी सातत्याने 'सोशल मीडिया' वापरतात. आपले फोटो, पोस्ट, विचार आदींच्या माध्यमातून या मंचावर व्यक्त होणे हा या मंडळींचा स्वभाव बनला आहे. या प्रकाराचा इतका अतिरेक झाला आहे की, आपल्या पोस्टवर जर कोणी लाईक, कमेंट केली नाही तर, लोकांना नैराश्य (डिप्रेशन) आल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरनेट उपलब्ध नसेल तर, ही मंडळी प्रचंड अस्वस्थ होतात. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या लोकांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेश आणि मानसोपचारतज्ज्ञांची मोठी गरज भासत आहे. इंटरनेटच्या आहारी गेलेल्या मंडळींना वेळीच सावरले नाही तर, त्याचा मानवी वर्तन व्यवहारांवर मोठा परिणाम पहायला मिळेल असा इशारा अभ्यासक देऊ लागले आहेत. अर्थात, 'सोशल मीडिया' वापरणाऱ्या सर्वंच मंडळींना सरधोपटपणे इंटरनेटच्या आहारी गेले असा शिक्का लावता येत नाही. पण, अपवाद वगळता वास्तव नाकारता येत नाही.

'सोशल मीडिया'च्या अतीवापराचे मानसिक परिणाम

'सोशल मीडिया'चा अतिवापर केल्याने निर्माण होणारे बहुतांश आजार हे मानसिक आहेत. ज्यमध्ये कारणाशियाव चिडचिडेपणा, हृदय धडधडणे, हात-पाय थरथरणे, हात-पायांसह शरीराच्या इतर भागांवरही घाम येणे असे प्रकार सुरु होतात. विशेषत: 'सोशल मीडिया'च्या अतिवापरामुळे आत्मविश्वास प्रचंड प्रमाणावर कमी झाल्याचीही उदाहरणे आहेत. नात्यांमधील संवाद कमी होऊन तो अबोला येण्यापर्यंत पोहोचणे. मनात न्यूनगंड तयार होणे. विक्षिप्तपणा वाढणे. बोलताना ताळतंत्र सुटणे, असंबद्ध बडबडणे असे प्रकार 'सोशल मीडिया'च्या आहारी गेलेल्या मंडळींमध्ये पहायला मिळतात. 'सोशल मीडिया'च्या अतिवापरामुळे बुद्धीची नैसर्गिक वाढही खुंटते.

'सोशल मीडिया'च्या अतीवापराचे शारीरिक परिणाम

'सोशल मीडिया'वापरताना तुम्ही माध्यम कोणते वापरता व त्याचा वापर कसा करता यावर होणारा शारीरिक त्रास अवलंबून आहे. मोबाईलवरुन 'सोशल मीडिया' हाताळताना सातत्याने मान खाली झुकली जाते. त्यामुळे मान आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास होतो. हा अजार पुढे स्पॉंडेलायसीसचे रुप धारण करु शकतो. सातत्याने मोबाईल विशिष्ट पद्धतीने पकडून ठेवल्याने हाताची बोटे आणि मनगटांचे दुखणे वाढते. मोबाईलवरुन टाईप करत असताना हाताच्या आंगठ्यांवर अकारण ताण होतो. सातत्याने एकाच ठिकाणी नजर खिळल्याने डोळ्यांचे विकारही होतात. संगणकाच्या माध्यमातूनही 'सोशल मीडिया'चा अतिवापर केल्यास शारीरिक समस्या निर्माण होतात. (हेही वाचा, लिव्ह-इन मध्ये राहताय ? या गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल)

'सोशल मीडिया'च्या वापराचा अतिरेक

दरम्यान, गेल्या काही वर्षांत 'सोशल मीडिया'च्या वापराचा अतिरेक झाल्याने युजर्समध्ये नैराश्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. खास करुन, पुणे, मुंबईसारख्या शहरांत हा आकडा मोठा आहे. यात महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पण, अलिकडे अल्पवयीन मुले आणि वृद्ध मंडळींमध्येही 'सोशल मीडिया'चा अतिवापर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्यातही नैराश्य, मानसिक आजार बळावत आहेत. केवळ 'सोशल मीडिया'चा अतिवापर केल्यामुलेच मानसिक आजारांची लागण झालेल्यांची संख्याही वाढत आहे.