PCOD: तरुणी, स्त्रियांमध्ये भीती आणि न्यूनगंड निर्माण करणाऱ्या या आजाराची लक्षणं, कारणं, उपचार आणि उपाय याबाबतचा एक्सपर्ट सल्ला
PCOS ( Photo Credits: File Photo & Pixabay)

बदलत्या आणि धावपळीच्या झालेल्या आजच्या जीवनशैलीचा मानवी आरोग्यावर अत्यंत घातक दुष्परिणाम होत आहेत. तरुण मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये आढळणारा एक आजार म्हणजे पीसीओडी’(PCOD). पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज हा स्त्रिया आणि मुलींच्या मनात एकाचवेळी काळजी आणि न्यूनगंड निर्माण करणारा एक आजार आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा सामना करावा लागणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढते आहे. नेमका पीसीओडी हा आजार नेमका जडतो कसा? तो होऊच नये म्हणून काय करावे, आणि झालाच तरी त्यावर उपचार करण्यापूर्वीच्या तपासण्या कोणत्या याबाबत Wockhardt Hospital Mumbai Central च्या स्त्री रोग विशेषतज्ज्ञ आणि प्रसुतीशास्त्रज्ञ डॉ गंधाली देवरुखकर  यांनी खास सल्ला दिला आहे.

‘पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज’ (पीसीओडी) या नावातच त्याबाबतचे संकेत मिळतात. पॉली म्हणजे अनेक आणि सिस्टीक म्हणजे गाठी, स्त्रियांमध्ये, तरुणींमध्ये आजकाल झपाट्याने आढळणारा हा ओव्हेरीयन म्हणजे अंडाशयाचा हा आजार आहे. अर्थातच या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतातआणि त्यामुळे मुख्यत: हॉर्मोन्सचा समतोल बिघडतो.

पीसीओडीची लक्षणं

• पीसीओडी या आजाराशी निगडित अनेक लक्षणं ही मासिक पाळीशी निगडीत आहेत.

• मासिक पाळीतील अनियमितता प्रमुख लक्षण

• पाळीदरम्यानचा स्त्राव कमी होऊन कालांतराने पाळी बंद होणे

• अनियमित मासिक पाळीचा परिणाम म्हणजे येणारे वंध्यत्व

• वजन वाढणं

• चेहरा, हातापायांवर आणि पोटावर लव येणे

• चेहऱ्यावर मुरुमं येणे

• मानेवरची त्वचा जाडसर होऊन काळी दिसणे

• केस गळण्याचं प्रमाण वाढतं

• काही महिलांची मानसिकता ढासळते

पीसीओडी कारणे

 • आनुवंशिक
 • इन्सुलिन प्रतिरोधन
 • स्थूलत्व
 • अयोग्य जीवनशैली
 • चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव व ताणतणाव.
 • पीसीओडी / पीसीओएस निदान
 • सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 • मनाने कोणतेही उपाय करू नयेत.
 • स्वत: संपूर्ण तपासणी (क्लिनिकल एक्झामिनेशन) डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी व रक्ताच्या तपासण्या करावयास सांगतील.

पीसीओडीसाठी करावयाच्या तपासण्या

 • सोनोग्राफी

ही एक अतिशय महत्त्वाची तपासणी आहे. यामध्ये अंडाशयाचे अगदी योग्य चित्र आपल्याला मिळते आणि पीसीओडी असल्यास त्याचे योग्य निदान होऊ शकते.

 • हॉर्मोन्स

आपल्या शरीरातील हॉमोन्सचे प्रमाण ही दुसरी महत्त्वाची तपासणी आहे. यात साधारणपणे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (एफएसएच), ल्युटेनायझिंग हॉर्मोन(एलएच), टेस्टॉस्टेरॉन, एन्टीम्युलेरियन हार्मोन (एएमएच) आणि डीहायड्रोएपिअँड्रोस्टेरॉनचे (डीएचइएएस) प्रमाण तपासून घेतले जाते. याबरोबर स्त्रीच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही तपासले जाते.

पीसीओडीचे शरीरावरील घातक परिणाम

या आजारामुळे हॉर्मोन्सचे समतोल बिघडते. परीणामी दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात तयार होणाऱ्या स्त्रीबीजाचे प्रमाणही घटते. यामुळे पुढे जाऊन त्यामुळे वंधत्व येण्याची शक्यता असते.

पीसीओडी / पीसीओएस उपचार

आजार होऊ नये म्हणून करण्याचे उपाय

सुयोग्य जीवनशैली = योग्य व वेळेवर घरचा पोषक आहार.

जंक फूड टाळणे, बेकरीचे, जड पदार्थ न खाणे, शक्यतो ताजे गरम रुचकर पारंपरिक अन्नपदार्थ मुलींना दिले पाहिजे. विशेषत: शाळेचा डबा देताना यानुसार योग्य नियोजन केले पाहिजे. यात एकमहत्त्वाची गोष्ट जी आजकाल अतिजागरुकतेमुळे चुकू शकते ती म्हणजे लागोपाठ दिला जाणारा जड आहार!

 • खेळ व इतर व्यायाम

प्रत्येक मुलीने दिवसातील ठराविक वेळ हा खेळण्यासाठी / व्यायामासाठी राखून ठेवलाच पाहिजे.

शाळेत खेळाच्या तासाला मैदानावर न खेळता झाडाखाली अथवा वर्गात बसून राहणे चुकीचे आहे. अपवाद फक्त आजारपणाचा! तसेच अभ्यास व ईतर छंदवर्ग याचे योग्य नियोजन करून आपापल्या आवडीनुसार बॅडमिंटन/पोहणे/टेनिस इत्यादीसाठी वेळ काढणे आवश्यक आहे.

वजन व उंचीचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट योगप्रकार देखील यासाठी उपलब्ध आहेत.

 • तणाव व्यवस्थापन

जीवनशैलीचे व तणावाचेदेखील नियोजन करणे हे अगदी शाळकरी मुलींमध्येही आवश्यक झाले आहे.यामध्ये ताणतणाव टाळणे महत्त्वाचे आहे. यात अगदी लहानसहान गोष्टींचापण यात समावेश असतो. ज्याचे महत्त्व बरेचदा पालकांच्या लक्षात येत नाही.

वैद्यकीय सल्ला घेऊन आणि योग्य चाचणीनंतरच उपाय सुरू करा. स्वतःच्या मनाने औषधोपचार करणं अनेक दुष्परिणांना कारणीभूत ठरते.

(सदर आर्टिकल  हे डॉक्टरचं वैयक्तिक मत आणि सल्ला आहे. आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. लेटेस्टली त्याच्या कोणत्याही परिणामांची जबाबदारी स्विकारत नाही. )