Representational Image of Rat (Photo Credits: Wikimedia Commons)

सध्या सर्वत्र फक्त कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबतची चर्चा सुरु आहे. दिवसेंदिवस या विषाणूग्रस्तांची संख्या वाढत आहे, अशात जगभरात एकप्रकारची अनामिक भीती पसरली आहे. या प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. एकीकडे लोक या कोरोना विषाणूचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे चीनमधून हँटाव्हायरस (Hantavirus) ची बातमी येत आहे, या विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या नवीन विषाणूला लवकरच आळा घातला नाही, तर हा विषाणूही पसरण्याचा धोका आहे.

हँटाव्हायरस म्हणजे काय? त्याची प्रारंभिक लक्षणे कोणती आहेत? कोरोना व्हायरसपेक्षा हा विषाणू भयानक आहे का? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात  सध्या नेटिझन्स गुंतले आहेत. हँटाव्हायरस सध्या ट्विटरवर टॉप ट्रेंडीग विषय बनला आहे. सध्या हा नवीन विषाणूही प्राणघातक ठरतो का काय, अशी भीती जनतेला लागलेली आहे. तर या हँटाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज आपण पाहणार आहोत हा विषाणू नक्की आहे तरी काय.

ग्लोबल टाईम्स ट्वीट -

ग्लोबल टाईम्सने आपल्या ट्वीटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम चीनमधील युन्नान प्रांतातील एका व्यक्तीचा, सोमवारी (23 मार्च, 2020) शेडोंग प्रांतात कामासाठी जात असताना बस मध्येच मृत्यू झाला. तपासणी केली असता, या व्यक्तीची हँटाव्हायरस चाचणी पॉझिटिव्ह होती. आता बसमधील उर्वरित 32 जणांची चाचणी घेण्यात आली असून, लवकरच त्याबाबत माहिती समोर येईल.

नेटीझन्समध्ये भीतीचे वातावरण -

 काय आहे हँटाव्हायरस? कसा होतो याचा संसर्ग? -

रोग नियंत्रण व निवारण केंद्रे (CDC) यांनी दिलेल्या माहितीनुसार, हँटाव्हायरस पल्मोनरी सिंड्रोम (HPS) म्हणजेच, हँटाव्यहारसचा संसर्ग हा मानवांमध्ये गंभीर, कधीकधी प्राणघातक श्वसन रोग म्हणून कार्य करतो. परंतु कोरोना व्हायरस सारखे याचा हवेतून संसर्ग होत नाही. हे विषाणू सहसा उंदीरांना संसर्ग करतात, परंतु त्यांच्यात रोगराई उद्भवत नाही. उंदरांचे मूत्र, लाळ किंवा मल यांच्या संपर्कातून मानवांना हँटाव्हायरसची लागण होऊ शकते. हँटाव्हायरस एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये संक्रमित केला जाऊ शकतो, याचा कोणताही पुरावा नाही. परंतु उंदरांचे मल, मूत्र किंवा लाळेला स्पर्श केल्यावर, आपल्या डोळ्याला, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केल्यास याचा संसर्ग होऊ शकतो.

लक्षणे - 

हँटाव्हायरसची सुरुवातीची लक्षणे फ्लूसारखीच आहेत, परंतु त्यानंतर श्वास घेण्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. हँटाव्हायरस संसर्ग काही प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्यास, हा रोग पाच आठवड्यांत दिसून येतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, शरीरावर वेदना आणि पोटाची समस्या यांचा समावेश आहे. (हेही वाचा: 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त धोका; वाचा काय सांगतेय सर्वेक्षण)

हँटाव्हायरसची उत्पत्ती चीनमध्ये झाली आहे का? तर नाही. हँटाव्हायरसचा पहिला रुग्ण मे, 1993 मध्ये अमेरिकेमध्ये आढळला होता. त्यामुळे कोरोना व्हायरससारखा हा व्हायरस नवीन नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण आहे. आपल्या घराची, आजूबाजूच्या परिसराची योग्य सफाई करत राहणे गरजेचे आहे.