Image For Representation (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus)  पासून वाचण्यासाठी प्रत्येकाकडून प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छतेच्या, आरोग्याच्या बाबत अचानक पणे आता सर्वच जण आग्रही झाले आहेत. पण वास्तविक या आजाराची लागण होण्यामागे रोग प्रतिकारक शक्ती आणि तुमचा मूळ रक्तगट हे सुद्धा कारण ठरू शकते. आपणास ठाऊकच असेल की या जीवघेण्या आजाराची सुरुवात चीन मधील वुहान येथून झाली होती, एकट्या वुहान येथेच या व्हायरसने 3100 च्या वर बळी  घेतले आहेत, तर जगभरातील लाखाहून अधिक व्यक्तींना या व्हायरसची लागण झाली आहे. यातील काही निवडक रुग्णांच्या वैद्यकीय माहितीच्या आधारे चीनच्या एका वृत्तपत्राने केलेल्या सर्वेक्षणात कोरोनाचा सर्वाधिक आणि सर्वात कमी धोका कोणत्या रक्तगटाला आहे हे सांगण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, ज्या व्यक्तींचा रक्तगट ओ (Blood Group O) आहे त्यांना या संक्रमणाचा सर्वात कमी धोका आहे तर रक्तगट ए (Blood Group A) च्या व्यक्तींना हा धोका सर्वाधिक आहे. Coronavirus रोखण्यासाठी वारंवार वापरताय सॅनिटायझर? 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या

वुहान येथे केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात कोरोनाची बाधा झालेल्या सर्वाधिक रुग्णांचा रक्तगट हा ए असल्याचे दिसून आले आहे. तर त्यापाठोपाठ बी रक्तगटाचेही रुग्ण कमी अधिक प्रमाणात होते, तर ओ रक्तगटाचे रुग्ण सर्वात कमी होते. 2173 जणांची माहिती अभ्यासण्यात आली होती, ज्यातील 206 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.धक्कादायक म्हणजेच या 206 जणांपैकी 85 जणांचा रक्तगट हा ए होता, तर केवळ 52 जण हे ओ रक्तगटाचे होते. तसेच या 2173  सॅम्पल्स मधील 32 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे ए रक्तगटाचे होते तर केवळ 25 टक्के रुग्ण हे ओ गटाचे होते. संबधित सर्वेक्षण डेली मेल मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

दरम्यान , कोरोनाची जगभरातील दहशत आता वाढतच चालली आहे. भारतात सुद्धा या व्हायरसचे तब्बल 148 रुग्ण आढळले आहेत ज्यातील अनेकांना परदेश प्रवासामुळेच कोरोनाची लागण झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यांची संंख्या 42 आहे, आतापर्यंत दिल्ली, कलबुर्गी आणि मुंबई येथे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाची बाब अशी कि हे तिन्ही मृत्यू 60वर्षांच्या वरील म्हणजेच कमी रोग प्रतिकारक शक्ती असणाऱ्यांचे झाले आहेत.

(टीप:  वरील लेख सर्वेक्षणाच्या आधारे लिहिण्यात आला आहे. यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. निकषांवर पोहचण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी नक्की संवाद साधा)