Obesity and Cancer: कर्करोगाची जवळजवळ 40% प्रकरणे लठ्ठपणाशी निगडीत; अभ्यासात धक्कादायक खुलासा
Obesity | Representational image (Photo Credits: pxhere)

Obesity and Cancer: प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले वजन (Obesity) हे अनेक रोगांना आमंत्रित करते आणि वजन वाढण्याचे मुख्य कारण हे चुकीच्या पद्धतीची जीवनशैली हे होय. चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, वजनवाढ, मानसिक आजार, थायरॉइड विकार, फॅटी लिव्हर, पीसीओडी, हृदयरोग असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. आता एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त वजन असण्याशी संबंधित कॅन्सरची (Cancer) प्रकरणे वेगाने वाढत आहेत. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जवळजवळ 40% कर्करोग प्रकरणे लठ्ठपणाशी संबंधित आहेत.

स्वीडनमधील मालमो येथील लुंड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात सुमारे 40 वर्षे 4.1 दशलक्ष सहभागींचे निरीक्षण करण्यात आले. त्यांचे वजन आणि जीवनशैलीची बारकाईने तपासणी केली गेली. याद्वारे संशोधकांनी 32 प्रकारचे कर्करोग आणि लठ्ठपणा यांच्यातील संबंध ओळखले आहेत. अभ्यासानुसार, आता प्रत्येक 10 पैकी 4 जणांना लठ्ठपणा-संबंधित कर्करोगाचा धोका असल्याचे दिसून आले आहे.

अहवालानुसार, आतापर्यंत लठ्ठपणा 13 प्रकारच्या गंभीर आजारांशी जोडला जात होता, परंतु आता ही संख्या 32 हून अधिक झाली आहे. या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआयमध्ये 5 पॉइंट्सने वाढ झाल्याने पुरुषांमध्ये या कॅन्सरचा धोका 24 टक्के आणि महिलांमध्ये 12 टक्क्यांनी वाढतो. लठ्ठपणामुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस आणि प्रसारास चालना मिळते. यासह ते ट्यूमरच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. (हेही वाचा: Mud Utensils Best For Cooking: चिखलाची भांडी स्वयंपाकासाठी सर्वोत्तम! नॉन-स्टिक भांड्यात स्वयंपाक करणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; भारताच्या सर्वोच्च पोषण संस्थेने दिली चेतावणी)

दरम्यान, लॅन्सेटमध्ये नुकतेच प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, देशात लठ्ठपणाचे प्रमाण 40% महिलांमध्ये आणि 12% पुरुषांमध्ये आढळून आले आहे. 30 ते 49 वयोगटातील 10 महिलांपैकी 5-6 महिला लठ्ठपणाने ग्रस्त असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. महिलांमध्ये लठ्ठपणाचा संबंध वृद्ध वयोगट, शहरी रहिवासी, श्रीमंत वर्ग आणि मांसाहारी लोकांशी अधिक मजबूत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणाशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जंक फूड कमी करणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.