Side Effects Of Tirzepatide: लठ्ठपणा जगरभरातील अनेक देशांच्या आरोग्य यंत्रणेसमोरील महत्त्वाचे आव्हान. अलिकडील काही वर्षांमध्ये हे आव्हान भारतातही (Obesity In India) जाणवू लागले आहे. दरम्यान, हा विषय एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे संबोधला जाण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच इंजेक्शनद्वारे औषध देऊन वजन कमी (Weight-loss Drugs) करता येऊ शकते, असा दावा केला जात आहे. दावा कसला, अशी औषधे बाजारात येऊ घातली आहेत. याच पार्श्वभूमीवर वजन कमी करण्यासाठी इंजेक्शनद्वारे देता येण्याजोग्या तिर्झेपाटाइड (Tirzepatide India) या नव्या औषधाने मोठी चर्चा निर्माण केली आहे. फार्मा कंपनी एली लिलीने येत्या काही महिन्यांत भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे, या औषधाने क्लिनिकल चाचण्यांमध्ये आशादायक परिणाम दर्शविले आहेत. परंतु संभाव्य दुष्परिणाम आणि दीर्घकालीन परिणामकारकता याबद्दल अनेक अभ्यासक आणि डॉक्टरांनी चिंता देखील व्यक्त केली आहे.
क्लिनिकल चाचण्या सकारात्मक पण आव्हाने कायम
मुंबईतील केईएम रुग्णालयात 40 रूग्णांचा समावेश असलेल्या पाच वर्षांच्या वैद्यकीय चाचणीत असे दिसून आले की, सहभागींनी वजन कमी करणारे औषध तिर्झेपटाइडचा वापर करून सरासरी 20 किलो वजन कमी केले. तथापि, पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचा दाह, मळमळ आणि उलट्या यासारखे दुष्परिणाम नोंदवले गेले, ज्यामुळे काहींना मात्रा समायोजित (कमी) करावी लागली. केईएम हॉस्पिटलमधील एंडोक्रिनोलॉजीचे प्रमुख डॉ. तुषार बंदगर यांनी टाईम्स ऑफ इंडीया नावाच्या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, 'पाश्चिमात्य लोकसंख्येच्या तुलनेत भारतीयांना सामान्यतः औषधांच्या कमी मात्रांची आवश्यकता असते आणि तेच तिर्झेपाटाइडच्या बाबतीत लागू होते. (हेही वाचा, Obesity and Cancer: कर्करोगाची जवळजवळ 40% प्रकरणे लठ्ठपणाशी निगडीत; अभ्यासात धक्कादायक खुलासा)
लठ्ठपणाचे संकट आणि वजन कमी करणाऱ्या औषधांचे आकर्षण
मार्च महिन्यात द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, शहरी भारतातील सुमारे 70% लोक लठ्ठ किंवा अती लठ्ठ आहेत. त्यामुळे टिर्झेपटाइड आणि नोवो नोर्डिस्कच्या सेमॅग्लूटाइड सारख्या साप्ताहिक इंजेक्शनसह वजन कमी करण्याच्या उपायांमध्ये अनेकांचा रस वाढला आहे. वजन कमी करण्याव्यतिरिक्त, अभ्यास या औषधांचा संबंध साखरेची पातळी सुधारण्याशी आणि हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाच्या चांगल्या आरोग्याशी जोडतात. (हेही वाचा, Fake Weight-Loss Drugs: वजन कमी करणारी बनावट औषधे विकणाऱ्या 250 वेबसाइट बंद; सायबर सिक्युरिटी फर्म BrandShield ची मोठी कारवाई)
पीसीआरएमकडून सावधगिरीचा इशारा
दरम्यान, अमेरिकेतील फिजिशियन कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिनने (पीसीआरएम) मळमळ, अतिसार, थायरॉईड कर्करोग आणि पित्ताशय रोग यासारख्या संभाव्य जोखमींचा हवाला देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पीसीआरएम च्या डॉ. वनिता रहमान यांनी म्हटले की, सर्वेक्षण केलेल्या यू. एस. च्या बहुतांश रुग्णांनी दुष्परिणामांमुळे किंवा विम्याच्या मर्यादांमुळे 12 महिन्यांच्या आत वापर बंद केला.
ग्रे मार्केट आणि अकाली वापराचे धोके
ऑल इंडिया असोसिएशन फॉर अॅडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी गॅस्ट्रोपेरिसिसचे अध्यक्ष बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. महेंद्र नरवारिया यांनी अशी औषधे ग्रे मार्केटमधून खरेदी न करण्याचा इशारा दिला. एक उदाहरण सांगताना ते म्हणाले, "परदेशातून औषध आणणाऱ्या एका रुग्णाला गॅस्ट्रोपेरिसिस झाला, ही अशी स्थिती होती जिथे पचलेले अन्न तीन दिवस पोटात राहिले". ते पुढे म्हणाले की, विमा संरक्षणाच्या अभावामुळे वजन कमी करण्यासाठी इंजेक्शन वापरणे थांबवणाऱ्या अनेक अमेरिकन लोकांनी कमी झालेले वजन परत मिळवले, ज्यामुळे बॅरिएट्रिक शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली. टीओआयने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, भारतातील एंडोक्रिनोलॉजिस्ट या औषधांबद्दल आशावादी आहेत. लीलावती रुग्णालयातील डॉ. शशांक जोशी यांनी लठ्ठपणाची अशी स्थिती असल्याचे वर्णन केले आहे जी "राष्ट्रांना दिवाळखोर करू शकते". त्यांनी अधोरेखित केले की या औषधांमुळे रुग्णांचे आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारू शकते आणि अनेक औषधांवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. दुसऱ्या बाजूला, तज्ज्ञांनी सावध केले आहे की, आहार आणि व्यायामासह जीवनशैलीतील बदलांच्या संयोगाने इंजेक्टेबल्स सर्वोत्तम कार्य करतात. केईएम हॉस्पिटलमधील डॉ. बंदगर यांनी निदर्शनास आणून दिले की इंजेक्शन केवळ भारतातील एका विशिष्ट, समृद्ध विभागाला आकर्षित करू शकतात, कारण तोंडावाटे औषधे सामान्यतः अधिक स्वीकारली जातात.