
पावसाळा आणि आजारपण हे समीकरण झालं आहे. पावसाची सुरुवात होताच अनेक आजार डोक वर काढू लागतात. सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू यांसारख्या आजारांना पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, विशेष खबरदारी घेतो. परंतु, पावळ्यासात अजून एक समस्या उद्भवते. ती म्हणजे इंफेक्शनची. दमट वातावरण, ओलसर शूज, साचलेल्या पाण्यातून, चिखलातून चालणे यामुळे स्किन इंफेक्शन, त्वचारोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात पायाची स्वच्छता नेमकी कशी राखायची? इंफेक्शन टाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायची? याबद्दल जाणून घेऊया..
फूट स्क्रब:
पायावरील मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन काढून टाकण्यासाठी नियमित फूट स्क्रबचा वापर करणे आवश्यक आहे. मृत त्वचेमुळे पायाचे तळवे कडक होतात आणि त्यांना भेगा जायला सुरुवात होते. परिणामी त्यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो.
मॉईश्चरायझर:
पाय स्वच्छ धुतल्यानंतर नियमितपणे मॉईश्चरायझरचा वापर करा. फूट लोशन म्हणून बदाम तेलाचा वापर करणे देखील उपयुक्त ठरेल. तसंच रात्री झोपण्यापूर्वी पायांना मॉईश्चरायझर किंवा तेल लावा.
ओलसर चप्पल, शूज वापरु नका:
पावसाळ्यात ओलसर चप्पल, शूजचा वापर करणे टाळा. तसंच ओले चप्पल, सॅंडल शू रॅक किंवा स्टँडमध्ये बंद करुन ठेवू नका. त्यामुळे त्यावर बॅक्टेरिया वाढू लागतील. तसंच फंगसचा धोकाही वाढेल. त्यामुळे चप्पल, सँडल उघड्यावर ठेवून पूर्णपणे सुकवा. ऊन आल्यास उन्हात चप्पल, सँडल नीट सुकू द्या. त्यानंतर त्याचा वापर करा.
पाय स्वच्छ ठेवा:
बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवा. पायांचे आरोग्य आणि सौंदर्य राखण्यासाठी स्क्रब, मॉईश्चरायजरचा नियमित वापर करा. तसंच आठवड्यातून एकदा बदाम तेल किंवा इतर कोणत्याही तेलाने पायांना मसाज करा. नखं फार वाढू देऊ नका. त्यामुळे त्यात घाण जमा होऊन इंफेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे नखं कापून पाय नेहमी स्वच्छ ठेवा.
योग्य फूटवेयरची निवड करा:
पावसाळ्यात बंद शूज घालणे टाळा. कारण त्यामुळे पावसाचे पाणी आत साचून राहते. त्यामुळे चालताना त्रास होण्याची शक्यता असते. तसंच इंफेक्शन होण्याचा धोका असतो. म्हणून योग्य फूटवेअरची निवड महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर ओले सॉक्स घालणं देखील टाळा.
पावसाळ्यात इतर अनेक गोष्टींसोबतच पायाची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पावसात चालून पाय दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ घालून त्यात पाय ठेवून बसा. या पाण्यात तुम्ही सुगंधी तेलही घालू शकता.