Pigeons |(Representationa l Purpose | Photo Credits: Pixabay.com)

Lung Disease Due To Pigeons: भारतीय घरांमध्ये पक्षी आणि प्राण्यांना खायला घालणे ही एक सामान्य प्रथा आहे. मात्र, आता शहरांमध्ये पक्षी कमी दिसत असले तरी, कबूतर (Pigeons) हा असा पक्षी आहे तो सर्वत्र आढळतो. घरांपासून रस्त्यांपर्यंत तुम्हाला कबुतरांचा थवा धान्य खाताना दिसेल. अनेक लोकांच्या घरांच्या बाल्कनीमध्येही कबुतरांची घरटे दिसून येतात. मात्र ही कबुतरे तुमच्यासाठी आरोग्याच्या समस्याही निर्माण करू शकतात. एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.

एका नवीन केस स्टडीमध्ये कबुतराची विष्ठा आणि पिसांच्या संपर्कात येण्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या जोखमीवर चर्चा करण्यात आली. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बाल्कनी आणि छतावरील कबूतरांची विष्ठा (ज्याला आपण धोकादायक मानत नाही), प्रत्यक्षात ऍलर्जीचे कारण ठरू शकते.

ही केस स्टडी पूर्व दिल्लीतील एका 11 वर्षाच्या मुलाबद्दल भाष्य करते, ज्याला कबुतरांमुळे तीव्र ऍलर्जी निर्माण झाली होती आणि त्याच्यावर सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. अभ्यासात असे म्हटले आहे की, मुलाला खोकल्यामुळे रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र नंतर त्याची श्वसनक्रिया बिघडल्याने त्याची प्रकृती अधिकच बिघडली. या मुलाला हायपरसेंसीटीव्हीटी न्यूमोनिटिस (Hypersensitivity Pneumonitis) असल्याचे निदान झाले, जे कबुतराच्या प्रथिनांच्या ऍलर्जीमुळे होते. त्याच्या वैद्यकीय चाचणीत फुफ्फुसात सूज असल्याचे दिसून आले.

त्यानंतर मुलाला 'स्टिरॉइड' औषध देण्यात आले आणि हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपीद्वारे श्वासोच्छवासाचा आधार दिला गेला, ज्यामध्ये नाकातील नळीद्वारे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यामुळे त्याच्या फुफ्फुसातील जळजळ कमी होण्यास आणि श्वासोच्छ्वास जवळजवळ सामान्य पातळीवर आणण्यास मदत झाली. हा फुफ्फुसाचा दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये अवयवाला दुखापत होते आणि रुग्णाला श्वास घेणे कठीण होते. ही स्थिती प्रौढांमध्ये सामान्य आहे आणि मुलांमध्ये दुर्मिळ आहे. (हेही वाचा: First Aid for Snakebites: सर्पदंश झाल्यास डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काय करावे)

दरम्यान, हा रोग टाळण्यासाठी, आपण आपल्या घराच्या आजूबाजूला असलेली कबुतराची विष्ठा आणि पिसे काढून टाकणे महत्वाचे आहे. तसेच, घराच्या आजूबाजूला कबुतरांना धान्य घालणे टाळा. त्यांना घरटी बनवण्यापासून रोखण्यासाठी वेळेवर इमारतींची देखभाल करत जा. कबुतरांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी जाळी वापरा. हातमोजे आणि मुखवटे यांसारख्या योग्य साधनांचा वापर करून कबुतराची विष्ठा नियमितपणे स्वच्छ करा आणि काढून टाका.