
19 November, International Men's Day : ज्याप्रमाणे 8 मार्चला जागतिक महिलादिन साजरा केला जातो, त्याचप्रमाणे 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन साजरा ( International Men's Day ) केला जातो. आपली संस्कृती पुरुषप्रधान असल्याने समाजात पुरुषांनी केलेल्या अनेक गोष्टी, त्याग हे त्यांचे कर्तव्यच असते असे समजून त्याला गृहीत धरले जाते. मात्र वयाच्या विविध टप्प्यावर अनेक मानसिक, शारीरिक टप्प्यातून जाणाऱ्या पुरुषाला देखील समाजात तितक्याच समानतेने वागवणं गरजेचे आहे. त्याचादेखील त्यागाची दखल घेणं गरजेचे आहे. आज समाजात आत्महत्येच्या टक्केवारीमध्ये 76% प्रमाण पुरुषांचे आहे. त्यामुळे त्याच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याकडे कटाक्षाने पाहणं गरजेचे होत चालले आहे.
जागतिक स्तरावर 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिन ( International Men's Day ) म्हणून साजरा केला जातो. मात्र याची सुरुवात कशी आणि कुणी केली हे तुम्हांला ठाऊक आहे का?
कसं सुरु झालं जागतिक पुरुष दिन सेलिब्रेशन ?
अमेरिकेच्या मिसौर यूनिवर्सिटीचे प्रोफेसर थॉमस योस्टर यांच्या प्रयत्नाने सुरुवातीला ' जागतिक पुरुष दिना'ची( International Men's Day ) संकल्पना पुढे आली. पूर्वी 7 फेब्रुवारी 1992 सालापासून अमेरिका, कॅनडा आणि युरोपीयन भागात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करायला सुरुवात झाली. मात्र 1995 सालापासून फेब्रुवारी ऐवजी नोव्हेंबर महिन्यात जागतिक पुरुष दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
1998 साली पहिल्यांदा साजरा झाला जागतिक स्तरावर पुरुष दिन
1998 साली त्रिनिदाद अँड टोबेगोमध्ये पहिल्यांदा 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली. डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी जागतिक पुरुष दिनाची संकल्पना पुढे आणली. यानंतर जगभरात 70 हून अधिक देशांमध्ये जागतिक पुरुषदिन साजरा केला जातो. यूनेस्कोने देखील जागतिक पुरुष दिनाचं महत्त्व जाणून त्याचं कौतुक केलं आहे.
भारतामध्ये 2007 साली पाहिलं सेलिब्रेशन
भारतामध्ये पहिल्यांदा 2007 साली सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. पुरुषांच्या अधिकारांसाठी झटणारी संस्था 'Save Indian Family' ने पाहिलं सेलिब्रशन केलं होतं. त्यानंतर 'ऑल इंडिया मेन्स वेल्फेयर एसोसिएशन'ने भारत सरकारकडे महिलांप्रमाणेच पुरुषांच्या विकासासाठीदेखील विशेष मंत्रालय सुरु करण्याची मागणी केली होती.
अनेकदा स्त्रिया बोलून किंवा रडून मनातल्या भावना व्यक्त करतात परंतु पुरुषांना 'रडणं', 'हार पत्करणं' हे कमजोरी असल्याचे संस्कार दिल्याने त्यांच्यावर अनेक गोष्टींचा मानसिक दबाव असतो. यामधूनच त्याच्या आरोग्यावर अनेक माध्यमातून काळत नकळत गंभीर परिणाम होत असतात. म्हणूनच आज समाजात स्त्री -पुरुष सामानतेच्या मागणीप्रमाणेच पुरुषांची दु:ख देखील जाणून घेणं अत्यावश्यक बनतं चालले आहे.