Intermittent Fasting And Cardiovascular Death: दीर्घकाळ उपवास म्हणजेच ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ ही वजन कमी करण्याची एक प्रभावी पद्धत आहे असे म्हटले जाते. अनेक फिटनेस एक्स्पर्ट शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा सल्ला देतात. मात्र अहवालानुसार ही पद्धत अत्यंत धोकादायक ठरू शकते. इंटरमिटेंट फास्टिंगमुळे हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका वाढतो, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जेवणाची वेळ दररोज फक्त आठ तासांपर्यंत मर्यादित ठेवल्यास म्हणजेच इंटरमिटेंट फास्टिंग केल्यास हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका 91 टक्क्यांनी वाढतो.
शिकागो येथे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अभ्यासात ही बाब समोर आली आहे. या अभ्यासात, वैज्ञानिक प्रोटोकॉलसह सर्व प्रोटोकॉलचे पालन करून संशोधन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
शांघाय जिओ टोंग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे व्हिक्टर झोंग यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. यामध्ये यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असलेल्या 20,000 प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण केले. यामध्ये 2003 ते 2019 पर्यंत मृत्यू डेटा आणि प्रश्नावलीच्या प्रतिसादांचा समावेश आहे. विश्लेषणामध्ये समाविष्ट केलेल्या लोकांचे सरासरी वय 48 वर्षे होते आणि त्यापैकी निम्मे पुरुष होते. त्यांच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे प्रमाण कमी होते. (हेही वाचा: Sleep Deprivation: कोविडनंतर निद्रानाशाच्या समस्येमध्ये वाढ; 61% भारतीय लोक 6 तासांपेक्षा कमी शांत झोप घेतात- Survey)
झोंग यांनी असेही सांगितले की, रुग्णांनी किती वेळ ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ केला हे स्पष्ट नाही, परंतु संशोधकांनी असे गृहीत धरले की त्यांनी ते रोज केले असावे. अभ्यासात 8 तास ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ आणि हृदयाशी संबंधित मृत्यू यांच्यातील सकारात्मक संबंध दिसून आला आहे. याबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठातील मानवी चयापचय विषयाचे एमेरिटस प्रोफेसर कीथ फ्रेन यांनी यूके सायन्स मीडिया सेंटरला दिलेल्या निवेदनात सांगितले की, इंटरमिटेंट फास्टिंग करणे हा वजन कमी करण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. मात्र आताचा हा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण तो इंटरमिटेंट फास्टिंगच्या दीर्घकालीन परिणामांवर भाष्य करतो.