उत्तम झोप (Good Sleep) हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे, परंतु आजच्या काळात लोकांच्या झोपेच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. व्यक्ती कोणत्याही वयाची असो, आजकाल रात्री चांगली झोप मिळणे खूप कठीण असल्याचे सिद्ध झाले आहे. यामागे सोशल मिडिया हे एक महत्वाचे कारण आहे. सोशल मीडियाचा केवळ प्रौढांच्याच नव्हे तर लहान मुलांच्या जीवनावरही परिणाम होत आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, 10 वर्षांपर्यंतची मुले रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया साइटवर राहिल्यामुळे, आठवड्यात एक रात्र कमी झोप घेतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर ते दररोज काही तास कमी झोपतात. दहा वर्षांपेक्षा लहान मुलांना रात्री 9 ते 12 तास झोपण्याचा सल्ला दिला जातो. कमी झोपेमुळे त्यांची शाळेत खराब कामगिरी होऊ शकते, त्यांच्या वर्तनातही बदल होऊ शकतो. डेलीमेलच्या मते, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या 10 वर्षांपेक्षा कमी मुलांची झोप कमी असते आणि त्यामुळे त्यांना रात्री सरासरी फक्त 8.7 तासांची झोप मिळते.
डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटीच्या डॉ जॉन शॉ यांच्या नेतृत्वाखाली लीसेस्टरच्या शाळांमध्ये केलेल्या अभ्यासात मुलांच्या झोपेबद्दल बरीच माहिती उघड झाली आहे. यामध्ये दिसून आले आहे की, लहान मुले 12 तासांऐवजी फक्त 8 तासांची झोप घेत आहेत. झोप न येण्यामागे मोबाईल फोन हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अभ्यास 10 वर्षांखालील 60 शालेय विद्यार्थ्यांवर केला गेला.
त्यापैकी बहुतेक जण सोशल मीडियाचा वापर करत होते. यातील 69 टक्के मुलांनी सांगितले की, ते दिवसातून चार तास मोबाईल फोन वापरतात आणि सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यापैकी 89 टक्के मुलांनी स्वतःकडे स्मार्टफोन असल्याचे मान्य केले. सुमारे 55 टक्के मुले टॅब्लेट वापरतात आणि 23 टक्के मुले लॅपटॉप वापरतात.
संशोधनात असेही आढळून आले की मुले वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःला व्यस्त ठेवतात. त्यामध्ये व्हिडिओ शेअरिंग अॅप टिक-टॉकचाही समावेश आहे. 57 टक्के लोकांनी फोटो शेअरिंग साइट इंस्टाग्राम, 17 टक्के रेडिट फोरम आणि 2 टक्क्यांहून कमी लोकांनी फेसबुकचा वापर करत असल्याचे सांगितले. दोन तृतीयांश मुले झोपण्यापूर्वी सोशल मीडियाचा वापर करतात, असेही संशोधनात आढळून आले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात जॉन्सन अँड जॉन्सन प्लांटचा उत्पादन परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई)
संशोधनात असे आढळून आले की, 2000 नंतर जन्मलेले सहभागी जीवनाबद्दल कमी समाधानी होते आणि त्यांचा आत्मसन्मान कमी होता. 1990 च्या दशकात वाढलेल्या लोकांपेक्षा ते कमी आनंदीही होते. तर, 2012 नंतर सरासरी किशोरवयीन मुलांच्या जीवनातील समाधान, आत्मसन्मान आणि आनंदात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, प्यू रिसर्च दरम्यान, असे आढळून आले की अमेरिकेतील प्रत्येक पाचव्या तरुणाने म्हणजे 19 टक्के लोकांनी एका वर्षात कोणत्या ना कोणत्या ऑनलाइन सट्टेबाजीमध्ये पैसे गुंतवले आहेत. ज्यामध्ये ते बहुतांश वेळा ऑनलाइन बेटिंगचे बळी ठरले आहेत.