Hair Health | (Photo credit: archived, edited, representative image)

Hair and Nutrition: तुमचे केस हे केवळ सौदर्य किंवा देखणेपणाचा भाग नाही तर, तो तुमच्या आरोग्याचा आरसा देखील असू शकतो. त्यामुळे तुमच्या केसांचा पोत, त्याचा सुदृढपणा, वाढ, त्यातील बदल, अकाली पांढरेपणा, केस गळणे (Hair Fall Causes), हार्मोनल असंतुल याकडे गांभीर्याने पाहा. कारण, त्वचारोगतज्ज्ञ आणि अभ्यासक सांगतात की, केसांचा कोरडेपणा, जास्त प्रमाणावर होणारी केसगळती, अकाली रंग बदल होणे किंवा ठिसूळ, टक्कल पडणे (Baldness) केस हे आरोग्याच्या गंभीर समस्येचे कारण असू शकते. म्हणून त्याकडे वेळीच काळजीपूर्वक पाहून उपचार घेणे आवश्यक ठरते. केस तुमच्या आरोग्यावर कसे ठरतात? घ्या जाणून.

घाबरु नका पण लक्षणांकडे लक्ष द्या

आपल्या शरिरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला किंवा भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवणार असेल तर तो अपवाद किंवा अपघात वगळता अचानक उद्भवत नाही. त्या आधी आपले शरीर नेहमीच कोणते ना कोणते संकेत देत असते. काही तज्ज्ञ तर असे सांगतात की, आपले शरीर संभाव्य त्रासाची लक्षणे प्रथम अनावश्यक घटकांवर दाखवते. उदा. केस, नखे आदी. त्यामुळे केसांच्या तक्रारी आणि त्या उद्भवण्याची प्राथमिक कारणे खालील प्रमाणे:

लोह आणि प्रथिनांची कमतरता: तुमचे केस जर अधिक प्रमाणात गळत असतील तर तुमच्या शरीरात लोह आणि प्रथिने म्हणजेच प्रोटीन्सची कमतरता असल्याचे ते लक्षण आहे. या दोन घटकांच्या कमतरतेमुळे केस गळणे किंवा ते पातळ होण्याच्या समस्या उद्भवतात. अनेकदा केस अनुवांशिक कारणांमुळेही गळतात हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.  (हेही वाचा, Hair Loss in Women: महिलांना टक्कल पडते का? केसगळतीची कारणे आणि कारणीभूत घटक कोणते? घ्या जाणून)

ताण तणाव: तुमची जीवनशैली जर धावपळ, अतिशय ताण तणावाची असेल तरी देखील त्याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो आणि ते गळू लागतात.

कोरडे आणि निस्तेज केस

हायपोथायरॉईडीझम (अंडरएक्टिव्ह थायरॉईड): केसांच्या पोत आणि वाढीवर परिणाम करते, ज्यामुळे ते कोरडे आणि खरखरीत होतात.

डिहायड्रेशन: पुरेसे पाणी न प्यायल्याने केस निर्जीव आणि निस्तेज होतात, होऊ शकतात.

ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचा अभाव: मासे, काजू आणि बियांमध्ये आढळणारे आवश्यक चरबी केसांची चमक आणि लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यांचाही अभाव असल्यास त्याचे परिणाम केसांवर पाहायला मिळतात. (हेही वाचा, Why Do Men Go Bald? पुरुषांचे केस का गळतात? त्यांना टक्कल पडण्याची कारणे काय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे)

अचानक टक्कल पडणे:

जर तुम्हाला तुमच्या टाळूवर गोलाकार टक्कल पडत असेल तर ते खालील आजारांचे लक्षण असू शकते.

अ‍ॅलोपेशिया एरियाटा: या प्रकारात केसांची मुळे ठिसूळ होऊन केस गळू लागतात.

पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम): पीसीओएस असलेल्या महिलांना हार्मोनल असंतुलनामुळे केस पातळ होणे आणि केस गळणे असे प्रकार उद्भवतात.

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

पोषक आहार आणि योग्य केसांची काळजी घेऊन केसांच्या किरकोळ समस्यांवर नियंत्रण ठेवता येते, परंतु अचानक किंवा जास्त बदल दुर्लक्षित करू नयेत. जर तुम्हाला खालील गोष्टींचा अनुभव येत असेल तर त्वचारोगतज्ज्ञ किंवा आरोग्यसेवा प्रदात्याचा सल्ला घ्या:

अधिक प्रमाणावर केस गळणे किंवा टक्कल पडणे

केसांमध्ये जास्त कोरडेपणा, खाज सुटणे किंवा जळजळ

चांगले पोषण असूनही केस पातळ होणे

थकवा, वजन वाढणे किंवा हार्मोनल समस्या यासारखी इतर लक्षणे

एकूणच काय तर, तुमचे केस तुमच्या एकूण आरोग्याबद्दल महत्त्वाचे संकेत देतात. या लक्षणांकडे लक्ष देऊन आणि संतुलित आहार राखून, ताणतणावाचे व्यवस्थापन करून आणि योग्य केसांची काळजी घेऊन, तुम्ही नुकसान टाळू शकता आणि लवकर आरोग्याच्या समस्या ओळखू शकता. जर तुमच्या केसांच्या समस्या कायम राहिल्या तर योग्य निदान आणि उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

वाचकांसाठी सूचना: वरील लेखात केसांचे आरोग्य आणि टक्कल पडणे यांबाबतचा मजकूर केवळ वाचकांच्या ज्ञानात भर म्हणून देण्यात आलेली माहिती आहे. वाचकांनी कोणत्याही प्रकारचा उपचार करण्यापूर्वी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि स्वत:च्या जबाबदारीवरच निर्णय घ्यावा.