H5N1 Bird Flu Strain In Milk: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी, 19 एप्रिल रोजी जाहीर केले की H5N1 बर्ड फ्लू विषाणूचा स्ट्रेन संक्रमित प्राण्यांच्या दुधात लक्षणीय प्रमाणात आढळला आहे. यामुळे जगात खळबळ उडाली आहे. मात्र दुधात विषाणू जगण्याचा कालावधी निश्चितपणे माहित नाही. यापूर्वी 1996 मध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा ए प्रथमच आढळून आला होता. परंतु 2020 पासून पक्ष्यांमध्ये त्याचा प्रसार लक्षणीय वाढला आहे. याशिवाय सस्तन प्राण्यांनाही या आजाराने ग्रासले आहे. या स्ट्रेनमुळे लाखो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. जंगली पक्ष्यांव्यतिरिक्त, जमिनीवर आणि सागरी सस्तन प्राण्यांनाही याची लागण झाली आहे. गायी आणि शेळ्या गेल्या महिन्यात बर्ड फ्लूला असुरक्षित असलेल्या प्राण्यांच्या यादीत सामील झाल्या.
टेक्सास आणि न्यू मेक्सिकोमध्ये गायी आजारी असल्याची नोंद आहे. यापैकी काही फार्मवर मृत पक्षी देखील आढळून आले आणि प्रयोगशाळेच्या चाचण्यांवरून काही गायींना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे पुष्टी मिळाली. या महिन्याच्या सुरुवातीला, टेक्सासमधील एका फार्ममध्ये संक्रमित गुरांच्या संपर्कात आल्यानंतर एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली होते व आता ही व्यक्ती बरे झाल्याची माहिती यूएस अधिकाऱ्यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल इन्फ्लूएंझा कार्यक्रमाचे प्रमुख वेनकिंग झांग म्हणतात की, 'टेक्सास प्रकरण हे गायीतून एव्हीयन इन्फ्लूएंझाचे पहिले प्रकरण आहे. या सध्याच्या प्रादुर्भावादरम्यान पक्ष्यांकडून गाय, गाईकडून गाय आणि गायीपासून पक्ष्यांमध्ये संक्रमणाचीही नोंद झाली आहे. जे सूचित करते की विषाणूला संक्रमणाचे इतर मार्ग सापडले आहेत.’ बर्ड फ्लूचा विषाणू आता सस्तन प्राण्यांच्या दुधातही आढळला आहे. कच्च्या दुधात विषाणूचे प्रमाण खूप जास्त असते. पण तज्ज्ञ अजूनही दुधात विषाणू किती काळ जगू शकतात यावर संशोधन करत आहेत. (हेही वाचा: No Age Limit For Health Insurance Plans: आरोग्य विमा नियमांमध्ये मोठे बदल; आता 65 वर्षांवरील लोकही घेऊ शकणार हेल्थ इन्शुरन्स, जाणून घ्या काय आहे नवीन पॉलिसी)
टेक्सास आरोग्य विभागाने सांगितले की, गुरांमध्ये संसर्ग हा चिंतेचा विषय नाही कारण दुग्धशाळा आजारी गायींचे दूध नष्ट करतात. झांग पुढे म्हणाले की, केवळ पाश्चराइज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वापरासह सुरक्षित अन्न पद्धती सुनिश्चित करणे आवश्यक आहे. आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, 2003 ते या वर्षी 1 एप्रिल पर्यंत 23 देशांमध्ये 889 मानवांमध्ये संसर्गाच्या या प्रकरणांमध्ये 463 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण 52 टक्क्यांवर पोहोचले आहे.