मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्यातील रहिवाशांशी संपर्क साधत धीर देण्याचे काम केले. घाबरून जाण्याचे कारण नाही असे दिलासादायक शब्द सांगताना मुख्यमंत्र्यानी घरात AC चा वापर करण्यासंदर्भात एक अत्यंत महत्वपूर्ण विधान केले. केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीच्या नुसार खबरदारी म्ह्णून काही दिवस गारव्यासाठी एसी सुरू करू नका. त्यामुळे हवेत आर्द्रता येते आणि कोरोनाला पोषक वातावरण निर्माण व्हायला मदत होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले, यावर पर्याय म्ह्णून, खिडक्या उघडा. घरात मोकळी हवा येऊ द्या, मोकळा श्वास घ्या असेही त्यांनी नमूद केले. मात्र AC मुळे कोरोनाला वाढण्यास पोषण मिळते हा दावा योग्य आहे का याबाबत काहीसा अजूनही संभ्रम पाहायला मिळतोय. याविषयी लेटेस्टली मराठी ने डॉ सचिन रामकृष्ण पाटील आणि डॉ. दिपाराणी पुजारी यांच्याशी संवाद साधला, त्यांनी दिलेल्या सविस्तर माहिती विषयी जाणून घ्या..
कोरोनाचा विषाणू हा AC च्या माध्यमातून पसरू शकेल असा कोणताही पुरावा सध्या तरी नाही,सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा विषाणू एअर बॉर्न नाही, म्हणजेच तो हवेतून पसरू शकत नाही. जर एखादी व्यक्ती बाधित असेल आणि त्या व्यक्तीच्या डायरेक्ट संपर्कात कोणी आले तरच हा विषाणू पसरू शकतो. त्यामुळे आद्रता किंवा AC च्या हवेतून हा विषाणू पसरतो असे सिद्ध करता येणार नाही. या विषाणूवर केवळ 80% वरील आर्द्रता व 30˚C पेक्षा अधिक तापमान यांचा परिणाम होतो. मात्र जरी हा विषाणु एसीतुन पसरण्याची शक्यता कमी असेल तरी सरकारी सुचनेचे पालन करणे नक्कीच योग्य ठरेल.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे, विषाणू एसी मध्ये अडकून मग पसरण्याची शक्यता अभ्यासली असता, घरातील एसी हे रूम मध्ये वरती असतात, त्यामुळे विषाणू तिथवर पोहचून अडकण्याची शक्यता नगण्य आहे, जरी कोरोना बाधित व्यक्ती शिंकली तरी ते विषाणू थोडया वेळाने खालीच पडतील. त्यामुळे एसी हा धोका मानता येणार नाही. उलट जास्तीत जास्त हा विषाणू सापडण्याची ठिकाणे म्हणजे घरातील कपडे पडदे , दरवाजा , टॉयलेट ही आहेत, मात्र त्यास ही घाबरून जाण्याचे कारण नाही, या वस्तू नीट निर्जंतुक करून घेतल्यास हे विषाणू अधिक काळ टिकून राहत नाहीत. जंतूंना ठेवा तुमच्या स्वीट होम पासून दूर; घर निर्जंतूक करण्यासाठी वापरा हे सोप्पे नैसर्गिक पर्याय
दरम्यान, प्राथमिक अभ्यासानुसार व्हायरसचा शरीरातील शिरकावाचा मुख्य मार्ग हा श्वसन मार्ग असल्याचे दिसून आले. कोरोना बाधित व्यक्ती शिंकते किंवा खोकते त्या वेळेस त्यातून बाहेर पडलेले विषाणू समोरच्या व्यक्तिच्या हातावर पडले आणि मग त्या व्यक्तीने त्या हाताने नाकाला, तोंडाला लावला तर या विषाणूंचे संक्रमण होते. म्हणूनच कोरोना संक्रमण टाळण्यासाठी वारंवार हात धुण्यास सांगितले जाते.