Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

कोविडची (Covid-19) कोविशील्ड लस (Covishield Vaccines) तयार करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India), कर्नाटकात अचानक झालेल्या मृत्यूंमुळे आणि हृदयविकाराच्या वाढत्या चिंतांवर प्रतिक्रिया देताना कोविड-19 लसींची सुरक्षितता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) यांच्या अलीकडील संशोधनांचा हवाला देत, लसीकरण आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही संबंध नसल्याचे सिरमने स्पष्ट केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हसन जिल्ह्यात 40 दिवसांत 23 जणांच्या मृत्यूनंतर तपासाचे आदेश दिले होते, ज्यामुळे लसींविरुद्ध संशय निर्माण झाला होता.

आज, 3 जुलै 2025 रोजी, सिरम इन्स्टिट्यूटने एका निवेदनात आणि X वर पोस्टद्वारे सांगितले की, आयसीएमआर आणि एम्स यांच्या दोन मोठ्या अभ्यासांनुसार, कोविड-19 लसी आणि अचानक मृत्यू यांच्यात कोणताही संबंध नाही. या लसी सुरक्षित आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहेत. सिरमने कर्नाटकात हसन जिल्ह्यात 1 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत 20 पेक्षा जास्त मृत्यूंच्या बातम्यांमुळे निर्माण झालेल्या चिंतांना उत्तर दिले. या मृत्यूंना कोविशील्ड लसीशी जोडण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला होता. त्यांनी लसींच्या ‘घाईघाईने मंजुरी’वर प्रश्न उपस्थित केले होते. सिरमने या दाव्यांचे खंडन केले आणि लसींची सुरक्षितता आणि कार्यक्षमता यावर ठामपणे विश्वास व्यक्त केला.

Covishield Vaccine:

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करून, कोविड-19 लसी आणि अचानक मृत्यू यांच्यात कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. या अभ्यासात असेही नमूद करण्यात आले की, अनुवांशिक उत्परिवर्तन, आधीपासून अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थिती, आणि जीवनशैली यांसारखे घटक अचानक हृदयविकाराच्या मृत्यूंसाठी कारणीभूत ठरतात. माजी एम्स दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, कोविड-19 लसींमुळे काही किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतात, परंतु हृदयविकार आणि लसीकरण यांच्यात कोणताही संबंध नाही. हृदयविकाराची कारणे अनुवांशिक, जीवनशैली, शारीरिक निष्क्रियता, आणि उच्च चरबीयुक्त आहार यांच्याशी संबंधित आहेत. (हेही वाचा: Covid-19 Vaccines and Sudden Deaths: 'कोविड-19 लसी सुरक्षित, देशात अचानक होणाऱ्या मृत्यूंशी कोणताही संबंध नाही'; ICMR आणि NCDC च्या अभ्यासाचा निष्कर्ष)

बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार-शॉ यांनीही सिद्धरामय्या यांच्या दाव्यांचे खंडन केले, आणि सांगितले की, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन यांना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देताना कठोर प्रोटोकॉल पाळले गेले. लसींना घाईघाईने मंजुरी दिल्याचा दावा चुकीचा आहे. कोविशील्ड लासिला ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाच्या सहकार्याने सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केले आहे. कर्नाटकातील अचानक मृत्यूंमुळे लसींविरुद्ध संशय निर्माण झाला असला, तरी वैद्यकीय तज्ज्ञ आणि संशोधनांनी या दाव्यांचे खंडन केले आहे.