Oximeter (Photo Credits: PTI)

देशासह राज्यात कोविड-19 (Covid-19) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये असताना ऑक्सिजनची (Oxygen) पातळी तापासणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी ऑक्सीमीटर (Oximeter) कामी येतो. परंतु, ऑक्सीमीटर द्वारे ऑक्सिजनची पातळी तपासताना त्याचा योग्य वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. ऑक्सीमीटर वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल तर सामान्यांना यासंबंधित अनेक प्रश्न पडतात. आज या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया... तसंच ऑक्सीमीटरने ऑक्सिजन लेव्हल चेक करण्याची योग्य पद्धत कोणती? आणि ऑक्सिजनची पातळी चेक करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल? हे देखील जाणून घेऊया...

1. प्रश्न: ऑक्सीमीटर हाताच्या कोणत्या बोटाला लावावे?

उत्तर: ज्या हाताने तुम्ही अधिक काम करता त्या हाताच्या बोटाला ऑक्सीमीटर लावा. उदा. जर तुम्ही उजव्या हाताने काम करत असाल तर त्या हाताच्या मधल्या बोटाला ऑक्सीमीटर लावा.

2. प्रश्न: रीडिंग योग्य यावी यासाठी काय गरजेचे आहे?

उत्तर: नखांवर किंवा बोटांवर नेल पॉलिश, तेल किंवा इतर कोणतीही गोष्ट लागलेली असता कामा नये. त्याचबरोबर हात पूर्णपणे कोरडे असावे. पल्स ऑक्सीमीटर सेंसर रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासतो. त्यामुळे यामध्ये कोणतेही गोष्ट आल्यास रीडिंग चुकीचे येऊ शकते. हात एकदम गार पडले असतील तर एकमेकांवर चोळून ते सामान्य तापमानावर आणा.

3. प्रश्न: बोटांच्या पोजिशनचा रीडिंगवर परिणाम होतो?

उत्तर: ऑक्सीमीटर लावल्यानंतर हात आणि बोटं सरळ ठेवावेत. बोटं दुमडल्यास त्याचा रीडिंगवर परिणाम होऊ शकतो.

4. प्रश्न: सामान्यपणे ऑक्सिजनची पातळी किती असणे गरजेचे आहे?

उत्तर: सामान्यपणे ऑक्सिजनची पातळी 94 असायला हवी. परंतु, तुमचे वजन खूप जास्त असल्यास ही पातळी 93-92 देखील असू शकते.

5. प्रश्न: ऑक्सिजन लेव्हल चेक करत असताना बसण्याची स्थिती किती महत्त्वाची आहे?

उत्तर: ऑक्सिजन लेव्हल चेक करताना आरामात शांतपणे सरळ बसा. श्वास सामान्य असावा. घाबरला किंवा दमला असाल तर श्वासाची गती सामान्य होईपर्यंत वाट पहा.

6. प्रश्न: ऑक्सिजन कितीपत खाली आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे?

उत्तर: ऑक्सिजनची पातळी सातत्याने 94 च्या खाली जात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. एकदा ऑक्सिजन लेव्हल चेक केल्यानंतर 85 किंवा 90 आलं आणि दुसऱ्यांदा चेक केल्यानंतर 95 किंवा त्याहून अधिक आल्यास पहिल्या वेळेसचे रिडींग चुकले असण्याची शक्यता आहे.

7. प्रश्न: ऑक्सीमीटर वेगवेगळ्या बोटांवर लावू शकतो?

उत्तर: ऑक्सीमीटर वेगवेगळ्या बोटांवर लावू नका. शक्यतो एकाच बोटाला लावून ऑक्सिजनची पातळी चेक करा. वेगवेगळ्या बोटांना लावल्याने रिडींग वेगवेगळे दिसेल.

8. प्रश्न: ऑक्सीमीटर ऑक्सिजनची पातळी बरोबर दाखवत आहे की नाही, हे कसे ओळखाल?

उत्तर: ऑक्सीमीटरमध्ये ऑक्सिजनची पातळी तपासताना तुमचे स्वास्थ्य देखील तपासणे गरजेचे आहे. तुम्ही स्वस्थ असताना ऑक्सिजनची पातळी 90 किंवा 91 आल्यास काहीतरी चुकीचे आहे, हे ध्यानात घ्यावे. जर तुम्हाला ताप, सर्दी, खोकला असल्यास ही पातळी 90-91 आल्यास हे रिडींग योग्य असू शकते.

(Pulse Oximeter: जाणून घ्या घरी ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी 'पल्स ऑक्सिमीटर'चा वापर नक्की कसा करावा, तसेच त्याचे फायदे, किंमत आणि कुठे विकत घ्याल)

या उत्तरांमुळे तुमच्या मनातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील, अशी आशा आहे. देशात कोविड-19 चे संकट गंभीर होत असताना योग्य ती काळजी घेणे हे स्वत:च्या आणि इतरांच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.