Covid-19 Vaccine | (Photo Credits: PTI)

जेव्हापासून कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव सुरु झाला आहे, तेव्हापासून जगातील अनेक शास्त्रज्ञ यावर अभ्यास करत आहेत. आतापर्यंत जितके अभ्यास समोर आले आहेत, त्या प्रत्येकामध्ये नवनवीन माहिती आणि प्रत्येक वेळी काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. आता अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी या विषाणूबाबत एक मोठा खुलासा केला आहे. संशोधकांनी संक्रमित व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मामधील विशिष्ट प्रथिने ओळखली आहेत.

ही प्रथिने कोणत्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल आणि कोणत्या रुग्णाचा या विषाणूमुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे याचा अंदाज लावण्यास मदत करू शकतात. म्हणजेच ही प्रथिने रुग्णाची स्थिती सांगू शकतील. जवळजवळ 332 कोविड-19 रुग्णांच्या रक्ताच्या प्लाझ्मा नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये हे उघड झाले आहे. या अभ्यासाचे प्रमुख कार्लोस क्रुचागा म्हणाले की, अशी हानिकारक प्रथिने ओळखणे उपयुक्त ठरू शकते. कोविड संसर्ग असलेल्या व्यक्तीचे रक्त घेऊन, त्यातील या प्रमुख प्रथिनांच्या पातळीची चाचणी केल्याने रुग्णासाठी गंभीर परिणामांचा धोका लवकर ओळखता येतो.

या माहितीचा वापर करून त्या रुग्णावर वेळेवर योग्य उपचार केले जाऊ शकतील. संशोधकांच्या टीमने यूएसएमधील सेंट लुईस येथील बार्न्स-ज्यूश हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोविड-19 रूग्णांच्या प्लाझ्मा नमुन्यांचा अभ्यास केला आणि त्यांची तुलना SARS-CoV-2 ची लागण न झालेल्या 150 लोकांच्या प्लाझ्मा नमुन्यांशी केली. (हेही वाचा: सीरम इन्स्टिट्यूटने पुन्हा सुरु केले Covishield लसींचे उत्पादन; येत्या 90 दिवसांत उपलब्ध होतील 6-7 दशलक्ष डोस- Adar Poonawalla)

जनरल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासामध्ये प्रथिनांचे ओव्हरएक्सप्रेशन आणि कमी एक्सप्रेशन ओळखण्यासाठी हाय-थ्रूपुट प्रोटीओमिक्स नावाचे तंत्र वापरले गेले. याला डिसरेग्युलेशन असे म्हणतात. कोणत्या प्रथिनांमुळे खरोखर गंभीर आजार होतात हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या चाचण्या केल्या. अभ्यासामध्ये रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळून आली. त्यानंतर असे आढळून आले की, या 32 प्रथिनांच्या उपस्थितीमुळे कोविड संसर्गादरम्यान रुग्णाची स्थिती बिघडते. त्यानंतर काही रुग्णांमध्ये अशी 5 प्रथिने आढळली जी रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता दर्शवतात. अशाप्रकारे आता डॉक्टर या प्रथिनांमुळे कोविड-19 रुग्णाची स्थिती समजण्यास सक्षम असतील.