शिर्डीच्या साईबाबा संस्थान कडून मंदिर परिसरामध्ये रक्तदानाचे उपक्रम घेतले जातात. आता या रक्तदान शिबिरामधून गोळा करण्यात आलेले रक्त गरजूंना मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिराने घेतला आहे. अनेक रक्तपेढ्या मंदिर परिसरामध्ये रक्त संकलन करतात. पण हे रक्त आता त्यांनाही मोफत द्यावे लागणार आहे. संस्थानकडून संबधित रुग्णांशी संपर्क करुन खातरजमा करण्यात येणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल आणि नॉट फॉर सेल लिहिलेले असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. अनेकांना वेळीच रक्त मिळाले तर त्यांना जीवनदान मिळू शकते. पण अनेकदा लोकांना रूग्णालयात रक्त मिळवण्यासाठी वणवण करावी लागते. रक्तासाठी पैसे आणि रक्ताच्या बदल्यात रक्ताचा पुन्हा साठा द्यावा लागतो. अनेकांसाठी कठीण प्रसंगात ही जुळवाजुळव करून आणणं जिकरीचं असते. त्यामुळे साई संस्थानचा हा निर्णय अनेकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान नुकतीच त्रिसदस्यीय समितीची बैठक झाली आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यात नवीन दर्शन पास पॉलिसी, डोनेशन पॉलिस, रक्तदान पॉलिसी, साईमंदिर निर्माण पॉलिसी, देशव्यापी मंदिर असोसिएशनची स्थापना आदींची घोषणा करण्यात आली आहे.
येत्या शुक्रवारपासून (29 सप्टेंबर) प्रायोगिक तत्वावर टोकन नंबरसाठी बुकिंग केल्यावर भाविकांना मेसेज पाठवला जाणार आहे. दर्शन पासेसमध्ये होणारा गैरवापर रोखण्यासाठी साईंच्या आरतीचे सशुल्क पासेससाठी शिफारस करताना यापुढे सर्व भाविकांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेतले जाणार आहेत.