सध्या कोविड-19 (Covid-19) संसर्गाचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी, या रोगाचे परिणाम अजूनही दिसत आहेत. याआधी कोविड-19 चा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये अजूनही काही आरोग्याच्या समस्या समोर येत आहेत. तरुण आणि प्रकृतीने तंदुरुस्त दिसणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याच्या (Heart Attacks) घटनांमध्ये 20% वाढ झाली आहे.
जिममध्ये, डान्स फ्लोअरवर, लग्नसमारंभात अचानक तरुण लोक कोसळल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. याबाबत हृदयरोग तज्ञांचे म्हणणे आहे की, यातील काही प्रकरणांमध्ये दीर्घ-कोविड हे कारण असू शकते, सोबतच सक्रीय जीवनशैलीचा अभाव हेदेखील महत्वाचे कारण ठरू शकेल. परिणामी हार्ट फेल्युअरमुळे मृत्यू होत आहेत. मात्र ही बाब सिद्ध करण्यासाठी पुरेसा डेटा किंवा पुरावा उपलब्ध नाही.
फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, कार्डिओलॉजिस्ट डॉ अनिल शर्मा म्हणाले की, भारतीय हृदय इतर देशांपेक्षा '10 वर्षे जुने' मानले जाते. भारतात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Cardiovascular Diseases) आजारांचे सुमारे सहा कोटी रुग्ण आहेत आणि दरवर्षी सुमारे 25 लाख लोकांचा मृत्यू होतो. जेव्हा धमन्यांमध्ये 70% पेक्षा जास्त ब्लॉकेज असते तेव्हा हृदयाला त्रास होतो, ज्याला एनजाइना (Angina) म्हणजेच हृदयातील रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे छातीत दुखणे, म्हणतात.
डॉ शर्मा म्हणतात, अचानक गुठळ्या तयार झाल्यामुळे जेव्हा रक्त प्रवाह 100% थांबतो तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका म्हणतात. हे 25% लोकांमध्ये कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकते. सहसा स्त्रिया, वृद्ध आणि मधुमेही रुग्णांमध्ये हा प्रकार दिसतो. कधीकधी हृदयविकाराचा मोठा झटका आल्यानंतर हृदय थांबते, ज्याला सडन कार्डिअॅक अरेस्ट म्हणतात.
कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ झाकिया खान यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा केवळ फुफ्फुसांवरच नाही तर धमन्यांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे हृदय, फुफ्फुस आणि मेंदूमध्ये गुठळी निर्माण होत आहेत. नॉन-क्रिटिकल ब्लॉकेज अचानक फुटू शकते आणि हृदयाच्या तसेच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांना 100% अडथळा आणू शकते. ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय पर्यवेक्षणाशिवाय अॅनाबॉलिक स्टिरॉइड्सचे सेवन केल्याची अनेक उदाहरणे आहेत, परिणामी हृदयातील ब्लॉकेजेस वाढतात, ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. (हेही वाचा: Smartphone and Sex Life: तुम्ही देखील खिशात स्मार्टफोन ठेवत असाल तर व्हा सावध, येऊ शकते नपुंसकत्व, जाणून घ्या सविस्तर)
जिममध्ये जाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका शारीरिक श्रमामुळे आणि त्यानंतर प्लेक फुटल्यामुळे (Plaque Rupture) येऊ शकतो. प्लेक हा एक फॅटी पदार्थ आहे जो धमनीच्या भिंतीमध्ये जमा होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात. नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ विशाल खुल्लर म्हणतात की, बैठी जीवनशैली, जास्त वेळ बसणे, शारीरिक हालचालींचा अभाव ही देखील महत्वाची कारणे आहेत. आणखी एक कारणीभूत घटक म्हणजे अस्वास्थ्यकर आहाराचे सेवन, ज्यामध्ये प्रक्रिया केलेले अन्न, साखर आणि संतृप्त चरबीचे जास्त प्रमाण समाविष्ट आहे. म्हणूनच प्रत्येकाने नियमित व्यायाम, निरोगी खाण्याच्या सवयी आणि तणाव व्यवस्थापनास प्राधान्य देणे महत्वाचे आहे.