World No Tobacco Day 2020: 'जागतिक तंबाखू विरोधी दिना'निमित्त जाणून घ्या तंबाखू सोडण्याची महत्वाची कारणे
World No Tobacco Day 2020 (File Image)

धूम्रपान (Smoking) करणे हे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपण सर्वजणच जाणता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या ताज्या जागतिक तंबाखू अहवालानुसार, जगभरात सुमारे 80 लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू पावतात. महत्वाचे म्हणजे त्यातील 10 लाख लोक हे पॅसिव्ह स्मोकर आहेत. हे आकडे अतिशय धक्कादायक असून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 31 मे रोजी, जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day 2020) साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेद्वारा 1987 पासून या दिनाचे आयोजन केले जाते.

डब्ल्यूएचओने नमूद केले आहे की, तंबाखू उद्योग हा तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करून घेण्यासाठी अगदी पद्धतशीर, आक्रमक आणि टिकावात्मक धोरणे अवलंबत आहे. जागतिक तंबाखूविरोधी दिवस 2020 चा उद्देश हा, याबाबत काउंटर-मार्केटींग मोहीम राबवून तंबाखूपासून तरुणांना वाचवणे हा आहे. डब्ल्यूएचओने अनेक इंफ्ल्यूएंसर्सना आवाहन केले आहे की,  पॉप कल्चरमध्ये, सोशल मीडियावर, घरात किंवा वर्गात... कुठेही या तंबाखूविरूद्ध लढ्यात सामील व्हा. तर अशा या आजच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला धूम्रपान सोडण्याची काही कारणे सांगत आहोत.

> कोणत्याही व्यसनाचा परिणाम हा वाईटच असे म्हटले आहे, त्यानुसार तंबाखूच्‍या किंवा सिगारेटच्या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतो.

> तंबाखूचे सेवन करताना आपल्याला जाणवतही नाही, मात्र तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्‍यांचे विकार होऊ शकतात. ह्दयरोग, छातीत दुखणे, हदयविकाराच्‍या झटक्‍यामुळे अचानक मरण येणे, स्ट्रोक अशा अनेक गोष्टी तंबाखूच्या सेवनाने उद्भवतात. (हेही वाचा: धुम्रपानामुळे तणाव आणि सिझोफ्रेनिया आजाराचा वाढतो धोका!)

> तंबाखूच्या धुरात 250 हून अधिक घटक असून, त्यांचे अपूर्ण विघटन झाल्याने आपल्या रक्तात शोषलेले कित्येक घटक अनारोग्यास आमंत्रण देतात. दुष्परिणाम दिसायला काही वर्षांचा काळ जावा लागतो आणि कदाचित म्हणूनच वैधानिक इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले जाते.

> महिलांच्या धूम्रपानामुळे वेगवेगळी गुंतागूंत निर्माहोऊ शकते. गर्भधारणेशी संबंधित गुंतागूंत, अपुऱ्या दिवसांची प्रसूती, कमी वजनाच्या बाळाचा जन्म इत्यादी.

> महत्वाचे धूम्रपानाचा कुटुंबातील सदस्यांवरही परिणाम होतो, मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. धूम्रपान न करणारा व्यक्तीही, 2 पाकिट रोज धूम्रपान करणा=या बरोबर राहिल्यास, या धुम्रपान न करणा-यास रोज 3 पाकिट धूम्रपान करणा-या इतका त्रास होतो, हे लघवीच्या निकोटिनच्या पातळीचा अभ्यास करताना आढळून आले.

अशाप्रकारे धुम्रपानामुळे आपण आपले तर नुकसान करून घेताच आहोत मात्र आपल्या सोबत असणाऱ्या लोकांनाही त्या दरीत फेकत आहोत. धुम्रपान सोडणे अवघड नाही, काही छोट्या छोट्या उपायांनी त्यावर मात करू शकता, मात्र त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती हवी. तर अशा या आजच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण हे तंबाखूचे व्यसन सोडण्याचा निश्चय नक्कीच करू शकतो.