पावसाळा आणि आजारपण हे समीकरण झालं आहे. पावसाची सुरुवात होताच अनेक आजार वाढीस लागतात. या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. तसंच पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून, चिखलातून चालावे लागते. त्यामुळे पायांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण ही काळजी नेमकी घ्यायची कशी? याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात. ट्रेन, बसच्या गर्दीच्या प्रवासात पाय ओले व घाण होतात आणि इन्फेकशनचा धोका वाढतो. म्हणून यंदाच्या पावसाळ्यात या 3 सोप्या टीप्सने पायांची काळजी घ्या... (औषधांपेक्षाही गुणकारी आहेत पावसाळ्यातील फोडशी, टाकळासह या रानभाज्या, जाणून घ्या सविस्तर)
1. योग्य फूटवेयरची निवड करा:
पावसाळ्यात बंद शूज घालणे टाळा. कारण त्यामुळे पावसाचे पाणी आत साचून राहते. तसेच रोजच्या रोज शूज, चप्पल साफ करणे गरजेचे आहे. चप्पल, सॅंडल ओली झाली असेल तर ती पूर्णपणे कोरडी करा. कारण ओलाव्यामुळे बॅक्टरीयाची वाढ होते व त्यामुळे इन्फेकशन होण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर ओले सॉक्स घालणं देखील टाळा.
2. मॉइश्चराईजर लावायला विसरू नका:
पावसाळ्यात वातावरण थंड आणि दमट असल्याने आपल्याला मॉइश्चराईजर लावण्याची आवश्यकता वाटत नाही. परंतु, हे चुकीचे आहे. पावलात lubricating glands कमी प्रमाणात असतात. त्यामुळे पाय कोरडे होऊन त्यांना भेगा पडतात. म्हणून भेगांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि पावलांची त्वचा सौम्य राहण्यासाठी पायांना नियमित मॉइश्चराईजर लावणे गरजेचे आहे. पाय धुवून कोरडे केल्यानंतर त्यांना मॉइश्चराईजर लावा.
3. पाय स्वच्छ ठेवा:
पावसात पाय भिजले नाहीत तरी देखील पाय स्वच्छ ठेवा. जर पावसाच्या पाण्यात पाय भिजल्यास ते कोमट पाण्याने धुवा. पाण्यात अँटिसेप्टिक लिक्विडचे काही थेंब घालून पाय नीट धुवा. त्यानंतर स्वच्छ टॉवेलने पाय कोरडे करा. ऑफिसमध्ये किंवा प्रवासात पायावरची घाण, चिखल साफ करण्यासाठी तुम्ही वेट टिशूज वापरू शकता. त्याचबरोबर दोन बोटांमधील त्वचा आणि नखं देखील स्वच्छ करा. शक्यतो पायांची नखं कापा. त्यामुळे पावसाळ्यात नखांमध्ये घाण साचून राहण्याची शक्यता कमी होईल.
या तीन सोप्या टिप्ससह तुम्ही पायांची योग्य ती काळजी घेऊ शकता. त्यामुळे पायांना होणारे इन्फेक्शन टाळता येईल.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)