कांद्याच्या सालीचेही आहेत अनेक आरोग्यदायी फायदे; कित्येक रोगांवर आहे गुणकारी औषध
कांदा (Photo Credit : ThoughtCo)

कांदा... जेवणातील एक महत्वाचा घटक. भलेही सर्व भाज्यांमध्ये कांद्याचा वापर होत नसेल मात्र कांदा तोंडी लावायला नसेल तर कित्येकांना जेवण जात नाही. कांद्याचे काय फायदे आहेत हे जवळपास सर्वांनाच माहीत असावेत. पण कांदा कापल्यानंतर जी साल आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो त्याचेही बरेच फायदे आहेत हे अनेकांना माहीत नाही. आता कांदा कापल्यानंतर त्याच्या साली फेकून देण्याआधी नक्की विचार करा, कारण कांद्याप्रमाणेच कांद्याची सालदेखील आरोग्यदायी आहे.

> घशातील खवखव कमी करायची असेल तर पाण्यामध्ये कांद्याची साल मिसळा. गाळलेले पाणी गुळण्या करण्यासाठी वापरा. यामुळे घशातील खवखव कमी होण्यासाठी मदत होते.

> कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यास शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. परिणामी हृदयाचे आरोग्य चांगले राखले जाते. कांद्याच्या सालीमध्ये क्वॅरसेटीन नावाचे फ्लेनोवल असते. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.

> स्कीन अॅलर्जीवर उपाय म्हणून कांद्या हे उत्तम औषध आहे. कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा सकाळी ते पाणी अॅलर्जी असलेल्या ठिकाणी लावा. लवकरच अॅलर्जीची समस्या कमी होईल. तसेच चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कांद्याच्या रसयुक्त सालीमध्ये हळद मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही दिवसांतच चेहऱ्यावरील डाग कमी झालेले दिसतील.

> महागडे कंडीशनर वापरण्याऐवजी कांद्याच्या सालीचा वापर करून तुम्ही केस मुलायम आणि चमकदार करू शकता. यासाठी कांद्याची साल रात्राभार पाण्यात भिजत ठेवा, सकाळी  केस धुताना या पाण्याचा वापर करा.

> घरातील किडे, कीटके, डास यांना हटवण्यासाठी विविध प्रकारच्या ‘हिट’ प्रमाणेच कांद्याची सालही उपयोगी ठरते. रात्रभर कांद्याच्या साली पाण्यात भिजत ठेवा. या पाण्याला दुसर्‍या दिवशी खिडकी आणि दरवाज्यासमोर ठेवावे पाण्याच्या उग्र वासानेच घरातील किडे दूर जातात. डेंग्यूचे मच्छर हटवण्यासाठीही कांद्याची साल फायदेशीर आहेत.