Representational Image (Photo Credits: Pixabay)

‘गुड फ्रायडे’ (Good Friday), याच दिवशी येशूला क्रुसावर (वधस्तंभ) खिळवले जाऊन त्याची हत्या करण्यात आली. या दिवसाची आठवण म्हणून ख्रिस्ती बांधव हा दिवस शोकदिवस म्हणून पाळतात. येशूने मानव जातीला दिलेल्या नि:स्‍वार्थ प्रेम आणि क्षमा या संदेशाचे आजच्या दिवशी स्‍मरण केले जाते. या दिवसाला पवित्र शुक्रवार (Holy Friday), काळा शुक्रवार, महा शुक्रवार असेही म्हटले जाते. ‘गुड फ्रायडे’च्या आधी चाळीस दिवस ख्रिस्ती बांधव उपवास करतात, ‘गुड फ्रायडे’चा दिवस हा एक्केचाळीसावा असतो. हा दिवस अतिशय शांततेत, जास्तीत जास्त काळ प्रार्थनेमध्ये, एकूणच अतिशय साधेपणाने व्यतीत केला जातो.

प्रभू येशू ख्रिस्त गुरूवारी रात्री आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे जेवण (लास्ट सपर) करत होते. त्यावेळी दुसऱ्या दिवशी आपणाला क्रुसावर चढवण्यात येणार असल्याचे त्यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितले होते. तसेच त्यातील एक अनुयायी आपणाशी दगा करेल असेही ते म्हणाले होते. तसेच घडले, दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी प्रभू येशू यांना अनेक प्रकारच्या यातना देऊन सुळावर चढविण्यात आले. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अत्यंत कष्‍ट सहन करून आनंदाने बलिदान दिले. पापी व अत्याचारी लोकांनी मिळून येशूंना यातना दिल्या आणि त्यांना सुळावर चढविले. तेव्‍हाही प्रभू येशूंच्या मुखातून क्षमा आणि कल्याणाचा संदेशच बाहेर पडला. हा त्यांच्या क्षमाशील तत्‍वांचा आदर्श मानला जातो. म्हणूनच या दिवशी शक्यतो सर्वांना चुकांसाठी माफ केले जाते. (हेही वाचा: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती' ते 'ईस्टर' मुळे 14-21 एप्रिल दरम्यान सलग सुट्ट्यांची चंगळ)

कोणतीही चूक, कोणतेही पाप न केलेल्या परमेश्वराच्या पुत्राला सुळावर चढविले, मग हा शुक्रवार शुभ कसा? याचे उत्तर बायबलमध्येच सापडते. मृत्यूवर विजय मिळवून येशू पुनरुत्थानित झाला म्हणून शुक्रवारच्या या दिवसाला शुभ शुक्रवार म्हटले जाते, मात्र त्याला क्रुसावर चढवण्यात आले या गोष्टीची दुःखद झालरही या दिवसाला आहे. मृत्युदंड दिल्यानंतर तिस-या दिवशी म्हणजेच रविवारी त्याचे पुनरुत्थान (असलेल्या रूपात आणि देहात पुनर्जीवित होणे) झाले. म्हणून त्या दिवसाला ‘इस्टर संडे’ असे म्हटले जाते. याच दिवशी येशूने परत जन्म घेतला म्हणून, हा दिवस ख्रिसमसपेक्षाही अधिक पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो.