World Cancer Day 2020: 'जागतिक कर्करोग दिवस' निमित्त जाणून घ्या कर्करोगाचे विविध प्रकार आणि कारणे
World Cancer Day (Photo Credits-Twitter)

World Cancer Day 2020: प्रत्येक वर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक कर्करोग दिन' (World Cancer Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे मुख्य हेतू म्हणजे, कॅन्सरबाबत जागरूकता पसरवणं. सध्या जगभरात लोकांच्या मृत्यूचं प्रमुख कारण कॅन्सर ठरत आहे. प्रत्येक 6 मृत्यूंपैकी एका व्यक्तीचा मृत्यू हा कॅन्सरमुळे होतो. त्यामुळे लोकांमध्ये कॅन्सरबाबत जागृती असणे गरजेचे आहे. 2019 मध्ये कॅन्सर आजारासाठी 'I Am and I Will' ही थिम ठेवण्यात आली होती. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच कॅन्सर या आजाराबाबत लोकांमध्ये जाऊन जनजागृतीच्या माध्यमातून मोलाचा संदेश दिला जातो.

आपले शरीर हे पेशींपासून बनलेले आहे. शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग होतो. या पेशी वारंवार विभागल्या जातात. तर काही वेळेस विभाजनाच्या वेळी पेशींमध्ये गाठ निर्माण होते. बिनाइन आणि मॅलिग्नेंट या दोन पद्धतीची गाठ असू शकते. बिनाइन ही गाठ धोकादायक नसून म्रलिग्नेंट या गाठीचे कँन्सरमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. (हेही वाचा - World Cancer Day 2019: कॅन्सरमुळे 'हे' बॉलिवडू स्टार्स काळाच्या पडद्याआड)

कर्करोगाचे विविध प्रकार -

सौम्य कर्करोग -

या विकारात ट्यूमरच्या पेशी इतर अवयवांमध्ये पसरून नवीन गाठी तयार होत नाहीत. ही गाठ सहज काढून टाकता येते. म्हणूनच हा ट्यूमर प्राणघातक नाही.

घातक कर्करोग -

या कर्करोगाच्या गाठी सभोवताच्या व दूरवरच्या अवयावांमध्ये रक्तवाहिन्या आणि लसिका संस्थेच्या माध्यमातून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. त्यामुळे हा कर्करोग घातक ठरण्याची शक्यता असते. हा कर्करोग उद्धभवल्यामुळे मृत्यूही होऊ शकतो.

स्त्रियांमध्ये आढळून येणारे कर्करोग -

स्त्रियांमध्ये प्रामुख्याने स्तन, फुप्फुसे, मोठे आतडे, गर्भाशय आणि थायरॉइड या अवयवांमध्ये कर्करोग आढळून येतो.

पुरुषांमध्ये आढळून येणारा कर्करोग -

पुरुषांमध्ये प्रोस्टेट, फुप्फुसे, मोठे आतडे आणि मूत्राशयाचा कर्करोग आढळून येतो.

 

कर्करोगाची कारणे -

तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानाचे व्यसन केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. तसेच दारूच्या व्यसनामुळे यकृत, तोंड, घसा, स्वरयंत्र आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाची शक्यता असते. स्तन, बीजांड, प्रोस्टेट आणि मोठ्या आतड्यांचा कर्करोग हा काही कुटुंबांमध्ये जनुकीय कारणांमुळे आढळून येतो. जीवनशैली आणि पर्यावरणातील बदलांमुळे जनुकीय बदल होऊन कर्करोग होऊ शकतो. तसेच आहार-अति तेलकट आहारामुळे मोठे आतडे, गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे तंबाखू, गुटखा, धूम्रपान, तेलकट अन्न आदी पासून दूर राहा आणि कर्करोगापासून स्वत:चं सरंक्षण करा.