Republic Day 2023 (PC- File Image)

Republic Day 2023 Date in India: दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) म्हणून साजरा केला जातो. यंदा देश आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा होणार आहे. तिरंगा फडकावण्यासोबतच लोक 26 जानेवारीला परेडचा आनंदही घेतात. मात्र, प्रत्येक वेळी प्रजासत्ताक दिन आला की, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो? असा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच आला असेल. असा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल, तर आज आम्ही तुम्हाला देशाला प्रजासत्ताक घोषित करण्यासाठी 26 जानेवारी ही तारीख का निवडण्यात आली ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्यामागचा रंजक इतिहास...

26 जानेवारीलाचं संविधान का लागू झाले?

प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण या दिवशी आपल्या देशाची राज्यघटना लागू झाली. 1950 मध्ये भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. हा दिवस म्हणून दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय नागरिकांच्या लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याची शक्ती दर्शवतो. पण संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी ही तारीख का निवडण्यात आली हे तुम्हाला माहीत आहे का? या दिवशी संविधानाची अंमलबजावणी करण्यामागे एक विशेष हेतू होता, जो कदाचित बऱ्याच लोकांना माहित नसेल.

वास्तविक, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पण फार कमी लोकांना माहिती असेल की, स्वातंत्र्यापूर्वी 26 जानेवारीलाच स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता. 31 डिसेंबर 1929 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर 26 जानेवारी 1930 रोजी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि या दिवशी जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा फडकवला.

तथापि, नंतर 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर, 15 ऑगस्ट हा अधिकृतपणे स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित करण्यात आला. तर 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव अंमलात आला तेव्हाच या तारखेला महत्त्व देण्यासाठी संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी ही तारीख निवडण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना पूर्णपणे तयार झाली. परंतु 26 जानेवारीचे महत्त्व लक्षात घेऊन 1950 साली या दिवशी संविधान लागू करण्यात आले आणि देशाला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यावर्षी प्रथमच स्वतंत्र भारताने प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व -

प्रजासत्ताक दिन हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण 1950 मध्ये या दिवशी भारताची राज्यघटना औपचारिकपणे स्वीकारण्यात आली. ब्रिटिश वसाहतवादी भारत सरकार कायदा (1935) बदलून 26 जानेवारी 1950 रोजी, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना अंमलात आली. ज्यामुळे या देशातील सर्व नागरिकांनी उपभोगले पाहिजे असे मूलभूत अधिकार स्थापित केले. डॉ बी आर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मसुदा समितीने नवीन संविधानाची नोंद केली. हा दिवस स्वतंत्र भारताच्या योग्य भावनेचे प्रतीक आहे.