विजय दिवस 2019 (Photo Credits: Twitter)

बांग्लादेश निर्मिती (Bangladesh Formation)  युद्ध हे भारतीय सैन्याच्या (Indian Army) वीर पराक्रमाचे प्रतीक म्ह्णून ओळखले जाते, 16 डिसेंबर 1971 साली, बांग्लादेशच्या बाजूने पाकिस्तान (Pakistan)  विरुद्ध लढताना भारताचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंह अरोडा यांच्यासमोर पाकिस्तानी सैन्य प्रमुख जनरल नियाजी आणि तब्बल 93 हजार पाक सैनिकांना आत्मसर्पण केले होते .आणि यानंतरच बांग्लादेश या नव्या देशाचा जगाच्या नकाशावर जन्म झाला होता. हा पराक्रम साजरा करण्यासाठी पुढे हा दिवस विजय दिवस (Vijay Diwas) म्ह्णून साजरा केला जाऊ लागला. (Kargil Vijay Diwas 2019: कारगिल विजयाला 20 वर्षे पूर्ण; शहिदांना श्रद्धांजलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन)

आज याच दिवसाच्या निमित्ताने आपण बांग्लादेश निर्मिती युद्ध आणि भारतीय सैन्याच्या या पराक्रमाविषयी जाणून घेणार आहोत..

भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यावर काहीच वर्षांनी पूर्व पाकिस्तानी भागातून स्वतःसाठी नव्या प्रांताची निर्मिती व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. पश्चिम पाकिस्तानच्या तुलनेत पूर्वेकडील प्रांतास मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे ही मागणी पुढे आणखीनच उद्रेकी होऊ लागली होती. याच पार्श्वभूमीवर 1971 साली युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच पाकिस्तानी सैनिक तानाशाह याहिया खां याने 25 मार्च 1971 साली पूर्वेकडील रहिवाश्यांच्या भावना लक्षात न घेता युद्ध पुकारण्याचे आदेश दिले. या काळातच अनेक गांगरून गेलेल्या रहिवासीयांनी भारतात प्रवेश घेतला होता. या एकूणच गोंधळाच्या परिस्थितीत भारतीय सैन्याकडे पूर्व पाकिस्तान कडून मदतीची मागणी करण्यात आली.

दुसरीकडे, 3 डिसेंबर 1971 साली कोलकत्ता येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या एका जनसभेत बोलत असताना त्याच संध्याकाळी पाकिस्तानी हवाईदलाच्या भारतीय हवाई हद्दीत शिरकाव करून पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपुर आणि आग्रा येथील हवाईतळांवर निशाणा साधला होता. यानंतर इंदिरा गांधी यांनी थेट आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावून सेनेला पाकिस्तन विरुद्ध युद्धात उतरण्याचे आदेश दिले. याच दिवसापासून भारत- पाकिस्तान युद्धाला आरंभ झाला आणि 16 डिसेंबर 1971 साली हे युद्ध बांग्लादेशच्या निर्मितीने संपुष्टात आले.