Kargil Vijay Diwas 2019: कारगिल विजयाला 20 वर्षे पूर्ण; शहिदांना श्रद्धांजलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन
Kargil Vijay Diwas (Photo Credit : Twitter)

भारत पाकिस्तानमध्ये आतापर्यंत अनेक वाद झाले, मात्र 1999 च्या उन्हाळ्यात भारत पाकिस्तानमध्ये जे मर्यादित युद्ध घडले ते खास ठरले. हे कारगिल युद्ध (Kargil War) म्हणून ओळखले जाते. या युद्धाची व्याप्ती कारगिल परीसरापुरतीच मर्यादित राहिली म्हणून याला मर्यादित युद्ध संबोधले जाते. वीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानला या युद्धात पराभूत करून ऐतिहासिक विजय (Kargil Vijay Diwas 2019) प्राप्त केला होता. या युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले होते. या जवानांच्या शौर्याला उजाळा देण्याचा आजचा दिवस. या विजयाच्या 20 वर्षांच्या पुर्ततेमुळे भारतात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती 25 जुलै ते 27 जुलै अशी तीन साजरी होत आहे. या कार्यक्रमाचा समारोप 27 जुलैला होणार आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये समारोपाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील उपस्थित राहणार आहेत. आजच्या दिवसाचे निमित्त साधून द्रास-कारगिलमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख कारगिल इथे पार पडणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासाठी दिल्लीहून खास मशालाही पाठवण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता राष्टपती इथे पोहचले आहेत, आणि 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. राष्ट्रपती आणि तीनही सेवा दलांचे प्रमुख शहिदांना श्रद्धांजली वाहतील. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विजय दिवसाच्या निमित्ताने संसद परिसरात वृक्षारोपण करणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील वॉर मेमोरियलवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत. (हेही वाचा: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाची 10 वैशिष्ट्यं)

महाराष्ट्रात, सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुलाबा परिसरातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करतील. आजच्या दिवसानिमित नौदलाच्या ताफ्यातील आयएनएस मुंबई व आयएनएस चेन्नई या दोन युद्धनौका प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी नौदलाच्या पश्चिम कमांडच्या पुढाकाराने, सिने कलावंत व सैनिक यांच्यात फुटबॉलचा सामना रंगणार आहे. नरिमन पॉइंट येथील कुपरेज मैदानावर सायंकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल.

जानेवारीमध्ये सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक' (Uri: The Surgical Strike) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आजच्या दिवसाचे औचित्य साधून, या चित्रपटाचे राज्यातील 400 सिनेमागृहांत सकाळी 10 व 12 असे मोफत शो दाखवले जाणार आहेत. खास 15 ते 25 वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी या खेळांचे आयोजन केले गेले आहे.