महाराष्ट्राच्या इतिहासातील मानाचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक (Shivrajyabhishek Sohala) सोहळा येत्या 4 जून रोजी रायगडावर पार पडणार आहे. मराठी कालदर्शिकेच्या तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1674 ला रायगडावर सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जगभरातील शिवभक्तांमध्ये असणारा उत्साह लक्षात घेता 20 वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेक सेवा समिती आणि महाडच्या कोकण कडा मित्रमंडळाने रायगडावर (Raigad) याच तिथीला सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय छत्रपती संभाजी राजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांच्या नेतृत्वाने शिवराज्याभिषेक सोहळा हा तारखेनुसार म्हणजेच 6 जून रोजी सुद्धा साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर हे दोन्ही सोहळे अत्यंत साधेपणाने साजरे केले जाणार आहेत. चला तर मग तत्पुर्वी या दिनाच्या निमित्ताने जाणुन घेउया इतिहासातील या सुवर्ण मुहुर्ताविषयी काही रोचक गोष्टी..
(हे ही वाचा - शिवराज्याभिषेक दिन घरीच साजरा करा; छत्रपती संभाजी राजे यांचे शिवभक्तांना आवाहन, पहा ट्विट)
शिवराज्याभिषेक दिनाचा इतिहास
शिवराज्याभिषेक सोहळा हा मराठा साम्राज्याची मुहूर्तमुढे रोवणारा अत्यंत महत्वाचा दिवस म्ह्णून ओळखला जातो. यापूर्वी, राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास करून ही विधी पूर्ण केली होती.गागाभट्ट यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते.
विधीनुसार सुरुवातीला दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले होते अष्टप्रधानांतील आठ प्रधान विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. या जलाचा सुरवातीला महाराजांवर अभिषेक करण्यात आला होता. सोळा सुवासिनींनी महाराजांना पंचारतीने ओवाळले. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
शिवाजी महाराजांसाठी 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.महाराज सिंहासनी बसताच ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेमध्ये ’शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या.सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध वाद्यांच्या जयघोष झाला. प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला आणि स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, अन्य ठिकाणी या दिवसांच्या वेगवेगळ्या नोंदी असू शकतात याची दखल घ्यावी)